शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या सभागृहाच्या नामकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. राजकीय नेत्यांच्या नावाऐवजी तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अनंतपाळ महाराजांचे नाव सभागृहाला देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष बस्वराज मठपती यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्याची १९९९ मध्ये निर्मिती झाल्यानंतर तालुक्याच्या दृष्टीने अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्यात आले. यामध्ये पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीचाही समावेश आहे.
या इमारतीतील सभागृहाला राजकीय नेत्यांचे नाव देण्यासंदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. पंचायत समितीच्या बैठकीत यावरून दोन गट निर्माण झाल्याचे चित्र असून, त्यामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बस्वराज मठपती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
शिरूर अनंतपाळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले श्री अनंतपाळ महाराज यांचे नाव पंचायत समिती सभागृहाला देण्यात यावे, अशी भावना तालुक्यातील नागरिकांची आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचायत समिती सभागृहाला ‘श्री अनंतपाळ महाराज सभागृह’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, महादेव पारशेट्टे गुरुजी, अकबर तांबोळी, बाबुराव तोरणे, युवक शहराध्यक्ष प्रतीक पारशेटे, विशाल गिलचे आणि विनायक शिरूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
