एकीकडे शासनाकडून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीच्या मोहिमा राबविल्या जात आहेत, तर दुसरीकडे शिरूर अनंतपाळ तालुक्यात हिरव्यागार वृक्षांची सर्रास कत्तल होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. लाकडांची अवैध वाहतूक सुरू असल्याचा आरोप होत असून, वनविभागाच्या कारवाईवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी साकोळ, राणी अंकुलगा, बाकली, आजणी, तळेगाव आदी गावांच्या शिवारात तसेच रस्त्यांच्या परिसरातील मोठमोठ्या झाडांची कत्तल केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. लाकडाचे ओंडके ट्रॅक्टर, ट्रक आणि टेम्पोमध्ये भरून दिवसा तसेच रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वृक्षतोड करणाऱ्यांना वनविभागाचे अभय असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानगी घेतली जाते का? किती झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे? प्रत्यक्षात किती झाडांची कत्तल झाली? लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक आणि टेम्पोंकडे आवश्यक परवाने व कागदपत्रे आहेत का? याची तपासणी करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. मात्र, वाहनांची तपासणी, रात्रीची गस्त आणि नियमबाह्य वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई होते का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.
वृक्षतोडीमुळे तापमानवाढ, पावसाच्या अनियमिततेचा धोका आणि पशुपक्ष्यांचा अधिवास नष्ट होण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. शेती निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत असताना वृक्षसंपत्तीचा ऱ्हास चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे तालुक्यातील वृक्षतोडीच्या प्रकारांची विशेष पथकामार्फत चौकशी करावी, रात्रीच्या वेळी लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी गस्त पथक नेमावे, तसेच विनापरवानगी वृक्षतोड आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
एकीकडे वृक्षलागवडीचे आकडे मांडले जातात, तर दुसरीकडे अस्तित्वातील झाडांची कत्तल होत असताना वनविभाग गप्प असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील काही ठरावीक भागातून वृक्षतोड करून लाकूड विक्री केली जात असल्याने वनविभागाने गस्त वाढवावी आणि वाहतुकीवर लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी शुभम पवार यांनी तालुक्यात अवैध वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारींची वनविभागाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येईल, संबंधित गावांच्या शिवारात प्रत्यक्ष पाहणी केली जाईल आणि विनापरवानगी वृक्षतोड तसेच लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
