जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज परिसरात नदीपात्रात उडी घेतलेल्या ५३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शोधमोहीमेनंतर आढळून आला आहे. जळगाव एमआयडीसी येथे वास्तव्यास असलेले आणि नामांकित कृषी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले राजू शहाजी नेरकर यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तीचे नाव राजू शहाजी नेरकर (वय ५३, मूळ रा. जिल्हा भंडारा, सध्या रा. जळगाव एमआयडीसी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांनी शेळगाव बॅरेज पुलावरून नातेवाईकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधल्यानंतर नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली.
घटनेची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांच्या विनंतीवरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, भुसावळ नगरपरिषद अग्निशमन दलाला दुपारी २ वाजता घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर शोध व बचाव कार्यासाठी पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
नगरपरिषद प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नरवीरसिंग रावल आणि यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
शोधमोहिमेत भुसावळ अग्निशमन दलाचे कर्मचारी गजेंद्र जावळे, हितेश रायपुरकर, गौरव सपकाळे, गजू सावकारे आणि समाधान पाटील, यावल पोलीस स्टेशनचे उमेश महाजन व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेत सहकार्य केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याबाबत यावल पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन पुढील तपास करीत आहेत.
