वाशिम:-‘विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी कुठल्याही ‘शॉर्ट कट’चा वापर न करता प्रामाणिकपणे मेहनत करावी त्यासाठी कितीही परिश्रम करावे लागले तरी मागे न हटता आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील असावे. मार्गात खूप अडचणी निर्माण होतील अनेकदा लक्ष विचलित करणारे प्रसंग उद्भवतील परंतु अश्या अडचणी पार करत अडथळ्यांना दूर करत ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबायचे नाही.’ असे प्रतिपादन मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथे ‘सायबर जागरूकता अभियान’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले.


दि. १९ मे २०२२ रोजी सायबर जागरूकता अभियान अंतर्गत वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालयात पोलीस – विद्यार्थी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर प्रमुख अतिथी म्हणून जवाहर नवोदय विद्यालय, वाशिमचे मुख्याध्यापक श्री. सचिन खरात सर व उपमुख्याध्यापक श्रीमती सुनिता साखरे व जवाहर नवोदय विद्यालय, वाशिमचे ३०० विद्यार्थी उपस्थित होते. सायंकाळी ०७.०० वाजता जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाच्या बँड पथकाने पारंपारिक पद्धतीने सलामी देत व सुंदर स्वागतगीताने मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे स्वागत केले. यावेळी जवाहर नवोदय विद्यालय, वाशिमच्या बँड पथकाने बँड ट्रूप लीडर शुभम वनासकर याच्या नैतृत्वाखाली उत्कृष्ठपणे स्कूल बँड पथकाचे सादरीकरण केले.कु.स्वास्ती भालेराव हिने पाहुण्यांची ओळख करून दिली तर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सचिन खरात यांनी केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी कु. वैष्णवी वावकार व कु.गौरी ढवळे यांनी पार पडली.


सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेट वापराचे फायदे व तोटे, इंटरनेटच्या माध्यमातून घडणारे विविध सायबर गुन्हे, त्यांचे स्वरूप तसेच अश्याप्रकारच्या सायबर गुन्हयांपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे? त्यासाठी काय काळजी घ्यायची? त्याचबरोबर आयुष्यात ध्येय प्राप्त करण्यासाठी काय करावे? व काय करू नये? यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. दीपक घोडे सरांनी केले व शेवटी विद्यालयाच्या बँड पथकातील वाद्यांच्या सुमधुर सुरातील राष्ट्रगीताने सदर कार्याक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *