पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात घट झाली असून या पाझरतलावात उन्हाळी आवर्तन अद्याप सोडण्यात आलेले नाही.शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलाव ३.७५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा असून या पाझर तलावातील पाण्याचा फायदा कोंढापुरी,ख़ंडाळे, निमगाव म्हाळूंगी,कासारी,रासकरमळा, गणेगाव खालसा,पिंपरी दुमाला रणसिंगमळा, कवठीमळा शिवारातील शेतक-यांच्या शेतातील पिकांना होत असून या पाझर तलावावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत रांजणगाव गणपती,शिक्रापूर या गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविलेली आहे.
व्यंकटेश कृपा शुगर मिल्स, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ,पराग साखर कारखाना , ,श्रीनाथ साखर कारखान्यांकडून केल्या जाणा-या ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आलेल्या असून खोडवा ऊसाच्या उत्पादनात घट होत असल्याने तिस-या वर्षाचा ऊस रोटरणी करून काढून टाकण्याची कामे या परिसरात शेतक-यांनी चालू केली आहेत. रोटरच्या साहाय्याने ऊस काढणीला ट्रॅक्टरचालकांकडून १२०० /- ( बाराशे ) रूपये तास दर आकारला जात आहे. नांगरणीला ७०० ते ८०० रूपये तास दर आकारला जात असून काकरणीला १०००/- रूपये तास ,सरी पाडणे ७००/- रूपये तास ट्रॅक्टर चालकांकडून आकारले जात आहे. खोडवा ऊसाच्या ऊत्पादनातील घटीमुळी शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या परिसरात भुईमूग खुरपणीचीही कामे महिलांकडून सुरू करण्यात आलेली आहेत. भुईमूग खुरपणीच्या कामाला २०० ते २५० रूपये रोजंदारी दिली जात असून रोजंदारी देणे शेतक-यांना परवडत नसल्याने एकमेकांच्या शेतात खुरपणीसाठी जावून सावड पद्धतीने महिलांकडून भुईमूग खुरपणीची कामे केली जात आहेत. ऊसाच्या शेतात कांग्रेस, हरळ, वेलाचे गवत जास्त होण्याचे प्रमाण वाढल्याने तणनाशकाची फवारणी करण्याची कामे शेतक-यांनी चालू केली आहेत. तणनाशक फवारणीला १३००/- ( तेराशे ) ते १४००/- ( चौदाशे ) रूपये एकरी खर्च येत असल्याचे शेतक-यांनी सांगितले. शाळांना सुट्टीचे दिवस जवळ आल्यामुळे उन्हाळा सुरू झाल्याने कमरेला ट्युबा गुंडाळून शाळकरी मुले पाझर तलावात पोहण्याचा सराव करतानाही दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *