हेमंत पाटील; लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर घोषणा

उमरखेड/महागाव, दि. १३ (प्रतिनिधी) ः वसंत सहकारी साखर कारखाना येत्या १५ दिवसात सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे रुपयांप्रमाणे सर्वात जास्त भाव देण्यात येणार आहे.अशी घोषणा हेमंत पाटील यांनी रविवारी (दि.१२) वसंत सहकारी साखर कारखान्यात लक्ष्मी पुजनाच्या मुहूर्तावर ही महत्वपूर्ण घोषणा केली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
श्री हेमंत पाटील यांच्या हस्ते वसंत सहकारी साखर कारखाना येथे दिवाळीनिमित्त लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. यावेळी हेमंत पाटील म्हणाले की, परिसरातील शेतकऱ्यांची कामधेनू अशी ओळख असलेला वसंत सहकारी साखर कारखाना मागील ७ वर्षापासून बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणी हंगामात वेळेवर कामगार मिळत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस वेळेवर कारखान्यात घेऊन जाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत होते. वसंत सहकारी साखर कारखाना शेतकरी बांधवांचे हित लक्षात अतिशय कठिन परिस्थितीत मागील वर्षी तातडीने सुरू करण्यात आला. हा कारखाना परंतू अनेक राजकीय विरोधकांनी हा कारखाना सुरू होऊ नये यासाठी बरीच अडकाठी करण्याचा प्रयत्न मागील वर्षी केला होता. तरी देखील त्यांच्या विरोधाला न जुनानता शेतकऱ्यांमध्ये विश्वासारचे वातावरण तयार व्हावे म्हणून मराठवाडा व विदर्भातील सर्वात जास्त एक रकमी भाव २५०० रुपये देण्याचे कबूल केले होते व शब्द दिल्याप्रमाणे एक रकमी भाव शेतकऱ्यांना देण्यात आला. कारखान्याची यंत्रसामग्री जुनी असल्यामुळे त्यामध्ये आधुनिकता आनण्यासाठी अनेक बदल करण्यात आले असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने पैनगंगा नदीवर ७ बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे पैनगंगेच्या दोन्ही तिरावरील २५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कधीच पाण्याची कमतरता भासणार नाही. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पुढील काळात देखील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहनही हेमंत पाटील यांनी शेतकरी बांधवांना केले.
यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन अजय देशमुख सरसमकर होते. कार्यक्रमास गोदावरी परिवाराच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील, नगरसेवक संदीप ठाकरे (उमरखेड),मुख्य अभियंता के. एल.जाधव, मुख्य केमिस्ट मोकाशे, मुख्य लेखापाल एस. पी. मर्कटे, कार्यालयीन अधिकक्षक विनोद घाडगे, स्टोअर किपर व्यवहारे, सिनिअर इलेक्ट्रिक इंजिनियर श्री. कदम, गणेश चव्हाण, बाळू देशमुख, अफसर शेख, संदीप चंद्रवंशी, बालाजी साखरे, बंटी देशमुख, मारुती जाधव, अभय जाधव, दत्तराव राठोड, अनिकेत पाध्ये यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *