section and everything up until
* * @package Newsup */?> प्रचंड उत्साहाच्या वातावरणात विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण, विलास कारखान्यावर रंगला स्मृती सोहळा | Ntv News Marathi

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी युवापिढीने विलासरावांची प्रेरणा घेऊन काम करावे – नाना पटोले

लातूर प्रतिनिधी

आज देश कठीण परिस्थितीतून जात आहे. छत्रपती राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवण्याचा प्रयत्न होत आहे. या परिस्थितीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सारख्या नेतृत्वाची प्रेरणा घेऊन राज्यघटना आणि देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून पूढे येण्याचे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले.
लातूर तालुक्यातील विलास सहकारी साखर कारखाना येथे उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व “विलास भवन” कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी मोठया थाटात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.


माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवाजीराव मोघे, श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सिने अभिनेते रितेश देशमुख, लातुर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास दादा पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुरेश वरपूडकर, अभिजित वंजारी, सौ.सुवर्णताई दिलीपराव देशमुख, ट्वेन्टी वन ऍग्री लि.संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पूढे बोलतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विरोधी पक्षाची फोडाफोडी करुन लोकशाही कमकूवत करण्याचे काम भाजपाकडून होत आहे. अलीकडेच काँग्रेसमध्ये अशी एक फुट पडली आहे. परंतू गटातटाच्या राजकारणातील एक तट बाजूला गेल्यामूळे आता काँग्रेस अधिक मजबूत झाली आहे. “काँग्रेस संपवणारे संपतील पण काँग्रेस कधी संपली नाही” असे आपले नेते विलासराव देशमुख नेहमी सांगत असत. पक्षातील नवतरूणांनी आपल्या नेत्याचे आदर्श समोर ठेऊन आज पासून कामाला लागावे. जेणे करून राज्यात पून्हा काँग्रेस सत्तारूढ झालेली आपल्याला पाहयला मिळेल.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात विलासराव देशमुख हे एक अभूतपूर्व व्यक्तिमत्त्व होते त्‍यांनी केलेले सहकार, शिक्षण, सिंचन, औद्योगिक, वैद्यकीय क्षेत्रातील लोकाभिमुख कार्य आजही आपणाला लाभदायी ठरत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने आज यशस्वीपणे वाटचाल करीत असून सहकार क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्र बरोबर आज मराठवाडा विभागातील सहकार चालत आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार धीरज देशमुख जिल्हयातील सहकार आणि राजकारण सांभाळतील. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडे आज संपूर्ण महाराष्ट्र अपेक्षेने पाहत आहे. त्यांनी राज्यभरात फिरून पक्ष संघटना मजबूत करावी असे आवाहन करून आम्ही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

आज विलासराव असायला हवे होते – माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण

यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज महाराष्ट्राला काँग्रेस पक्षाला विलासराव देशमुख यांची गरज होती. आजची परिस्थिती लक्षात घेता त्यांची जुनी भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या भाषणातून एक प्रेरणा आम्हाला नक्कीच मिळते पण आज ते आपल्यात नाहीत ते आज आपल्यात असायला हवे होते परिस्थिती नक्कीच वेगळी असली असती असेही त्यांनी म्हटले यावेळी म्हटले. विलासराव देशमुख यांचे काम, विचार आजच्या नव्या पिढीने पुढे न्यायला हवेत ज्यामुळे आजच्या राजकीय परिस्थितीतुन नवी उभारी काँग्रेस पक्षाला मिळेल. आजचा भावस्पर्शी कार्यक्रम पाहून मन भरून आले या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले हे भाग्य समजतो असे म्हणत विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा लोप पावत आहे – जयंतराव पाटील

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले की, आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले पण काही अडचणी मुळे येता येईल की नाही असे वाटत होतं पण येऊ शकलो. विलासराव देशमुख यांचा पुतळा पाहिला आणि अजून अधिक प्रेरणा मिळाली इतका सुंदर पुतळा कारखाना आवारात उभारण्यात आला आहे या पासून आपणही सर्वांनी प्रेरणा घेऊन वागले पाहिजे असे ते म्हणाले. पुढे बोलताना जयंतराव पाटील म्हणाले की, तो काळ आणि आजचा काळ यात खूप फरक पडला आहे. सध्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात प्रत्येक जण आपली भूमिका आपल्या परीने बजावत आहेत एकमेकांना शिवीगाळ, धमक्या असे प्रकार आजच्या राजकारणात आपण पाहत आहोत थोर राजकीय व्यक्तीची महाराष्ट्रात रुजवलेली संस्कृती दुर्दैवाने आज लोप पावत आहे. यापूर्वी असे होत नव्हते एकत्रितपणे सत्ताधारी व विरोधक लोककल्याणकारी निर्णय घेऊन राज्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होते. झटक्यात निर्णय घेणे, लोककल्याणकारी निर्णय घेताना विश्वासअहर्ता असणे हे सामर्थ्य केवळ विलासराव देशमुख यांच्यात होते हे आजही यावेळी आवर्जून सांगावे लागेल असे म्हणत विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळ काळात आलेले अनुभव आणि आठवणीना उजाळा देत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्याच्या नेतृत्वात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

सर्वसामान्य माणसाचा विकासाला कायम प्राधान्य दिले – उल्हास दादा पवार

यावेळी बोलताना उल्हास दादा पवार म्हणाले की, आजचा कार्यक्रम पाहून विलासराव देशमुख यांची आठवण झाली. विचारांची निष्ठा कशी असावी हे त्यांच्यामुळे आपण शिकलो. लोकशाहीची सभ्यता काय असते ते त्यांच्याकडून शिकायला मिळाले कित्येकांनी त्यांच्यावर टीका केली पण त्यांनी फारसे मनावर न घेता सर्वसामान्य माणसाचा विकासाला कायम प्राधान्य दिले.

ते दिवस पुन्हा आणायचे असतील तर नेत्याचे अनुकरण करावे लागेल – माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रास्ताविक करताना विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत एक सच्चा कार्यकर्ता म्हणून प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या पक्ष कार्यातील आठवणी जागवल्या. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी जे प्रयत्न करीत आहेत त्यांचे ते प्रयत्न येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला राजकीय क्षेत्रातील शिखरावर नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पतंगराव कदम आणि विलासराव देशमुख यांचे घनिष्ठ संबंध आज विश्वजित कदम यांच्या रुपात आम्ही आजही जपले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्याला सामान्य माणसाच्या विकासासाठी काम करायचे आहे असे सांगून काँग्रेस पक्षाचे नेते यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यांनी ज्या प्रमाणे महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण केली होती तसा महाराष्ट्र पून्हा आपल्याला घडवायचा आहे. हे करण्यासाठी काँग्रेसचा विचार आपल्याला घराघरा पर्यंत न्यावा लागेल असेही त्यांनी म्हटले. याकामी आम्हाला जनतेने आशीर्वाद दयावेत अशी विनंती करून सर्व उपस्थितींचे आभार मानले. विलासराव देशमुख यांनी “माझया रक्तातील काँग्रेस कशी काढणार” असे उदगार काढले होते हे उदगार आजच्या राजकीय परिस्थितीत महत्वाचे ठरते असे नमूद करून मी आहे तिथे ठिक आहे असे सांगत सदयाच्या राजकीय चर्चांना पुर्णवीराम दिला.

रितेश यांनी आठवणी जागवल्या आणि उपस्थित जनसमुदाय गहीवरला

सिने अभिनेते रितेश देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, कुटुंबात रक्ताचे नाते, राजकारणात असताना जनतेचे नाते हे पाळले पाहिजेत असे म्हणत विलासराव देशमुख यांच्या आठवणी जाग्या केल्या. राजकारण करताना आपण कधीही वैयक्तीक टीका करू नये हे बाबानी शिकवले. पण आजचे राजकारण आणि वैयक्तिक टीका पाहता खूपच वाईट वाटते. साहेब आणि काका यांचे एकमेकांवर असलेले प्रेम, एकमेकांना दिलेली साथ एका भावाचे दुसऱ्या भावावरील प्रेम आम्ही पाहिले. साहेब गेल्यानंतर काकांनी दिलेला धीर आम्ही कधीही विसरू शकत नाही असे त्यांनी म्हटले. आठवणी सांगता सांगता त्यांचा कंठ दाटून आला आणि मग संपूर्ण उपस्थित जनसमुदायही गहीवरला. यावेळी मोठे बंधू माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी उठून रीतेश देशमुख यांना पाठीवर थोपटून धीर दिला. पूढच्या पिढीतील हे बंधू प्रेम पाहून उपस्थितांनी टाळयाच्या कडकडाटात या प्रसंगाला दाद दिली.

राजकारणाचा स्थर ढासळतो आहे – माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील

यावेळी बोलताना माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील म्हणाले की, आम्ही विलासराव देशमुख यांच्याकडून प्रेरणा घेऊन आजवर पक्ष वाढीसाठी कार्यकर्ता पासून ते मंत्री पदापर्यंत काम केले आणि हे काम करताना त्यांचे पाठबळ आणि प्रेम मिळत राहीले. आजही आम्ही त्यांच्याच प्ररेणेने काम करीत आहोत. आज राज्यात आणि देशात राजकारण कुठल्या स्तरांवर गेले आहे आपण सर्वजण पाहत आहोत. आज विलासराव देशमुख साहेब असते तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण नक्कीच फार वेगळे राहिले असते असे आम्हीच नाही तर राज्यातील जनता म्हणत आहे. यासाठी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातुरच्या बाहेर पडून महाराष्ट्राच्या राजकारणात पडावे जेणेकरून काँग्रेस पक्ष पुन्हा राज्यात उभारी घेईल असेही माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

देशमुख – कदम स्नेह पुढच्या पिढीतही कायम – विश्वजित कदम

यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले की, कदम कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबीय यांचे जिव्हाळ्याचे संबंध हे आजचे नाही तर पतंगराव कदम आणि विलासराव देशमुख यांच्या काळापासून आहेत जे आजही कायम आम्ही ठेवले आहेत. काँग्रेस पक्ष जेव्हा ही अडचणीत आला तेव्हा विलासराव देशमुख यांचे प्रेरणा देणारी भाषणे सोशल मीडियावर येतात आणि कार्यकर्त्यांत एक स्फुरण चढते ही त्यांची जादू आजही कायम आहे. विलासराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा, कर्तृत्वाचा वारसा, आज त्यांचे तिन्ही पुत्र पुढे चालवत आहेत आणि युवकांसाठी प्रेरणा देत आहेत. पक्ष बदलाच्या कुणी कितीही वावड्या उठवल्या तरी त्याकडे लक्ष न देता युवकांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आम्ही त्यांची व पक्षाची साथ कधीच सोडणार नाहीत असे सांगत त्यांनी उपस्थितांना विश्वास दिला.

साहेबांचा प्रत्येक गुण सर्वश्रेष्ठ सर्वांचे अनुकरण व्हावे – माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

यावेळी अध्यक्षीय समारोप करताना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले की, मांजरा परीवारातील कारखान्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख साहेबांचा हा पूर्णाकृती चौथा पुतळा आहे. या प्रत्येक पुतळ्याचे वैशिष्ट्य वेगळे आहे. त्यामूळे पाहणाऱ्यांना प्रत्येक पुतळा सर्वश्रेष्ठ आहे. साहेबांचे गुणवैशीष्टयेही अशीच होती. त्याचा प्रत्येक गुण सर्वश्रेष्ठ होता. या सर्व गुणांचे अनुकरण करणाऱ्याला श्रेष्ठत्वच मिळेल असे उदगार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी काढले. गावचा एक सरपंच, आमदार, मुख्यमंत्री होऊ शकतो हा विश्वास बाळगूण नव्या पिढीतील प्रत्येक कार्यकर्त्यांने कार्यरत बनले तर राज्यात आणि देशात परीवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. प्रारंभी माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व “विलास भवन” कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास राज्यसभेसाठी उमेदवारी मिळालेले चंद्रकांत हंडोरे यांचा सन्मान तसेच विलास कारखान्याच्या ५ लाख ३५ हजार २५१ क्विंटल साखर पोत्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कायक्रमाच्या सुरूवातीला महाराष्ट्र गीत होऊन माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन पार पडले. दरम्यान यावेळी पुतळा अनावरण प्रसंगी हेलिकॉप्टरने श्रध्दा एनर्जी ॲड इन्फ्रा प्रोजेक्ट्रस कडून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.


या संस्मरणीय स्मृती सोहळ्यास माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आ. त्र्यंबक नाना भिसे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, लातुर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष किरण जाधव, लातुर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर कारखाना चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना चेअरमन श्याम भोसले, लातुर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुनील पडिले, लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्हा.चेअरमन प्रमोद जाधव, जागृती शुगर्स अँड अलाईड उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, ट्वेन्टी वन शुगर्स व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास को.ऑप.बँक व्हा.चेअरमन समद पटेल, रेणा सह. साखर कारखाना व्हा. चेअरमन आनंतरव देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज व्हा. चेअरमन सचिन पाटील या मान्यवरांसह विलास सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन रविंद्र काळे, गोविंद बोराडे, नारायण बिडवे, अनंत बारबोले, रणजित पाटील, गोविंद डुरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, भारत आदमाणे, गुरुनाथ गवळी, कार्यकारी संचालक युनिट १ संजीव देसाई, कार्यकारी संचालक युनिट २ ए.आर.पवार यांच्यासह मराठवाडयासह राज्यातील विविध जिल्हयातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मांजरा परीवारातील सर्व संस्थाचे संचालक, विविध संस्था पदाधिकारी, सदस्य, कारखाना सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तसेच लातुर शहर व जिल्हा काँग्रेस विविध सेलचे पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते,नागरिक यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुध्‍नवा पत्की आणि क्षिप्रा मानकर यांनी केले तर शेवटी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार व्हा. चेअरमन रवींद्र काळे यांनी मानले.

प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9822699888 / 9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *