अहमदनगर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी देण्यात येणार निधी तुटपुंजा आहे. सध्याच्या महागाईचा विचार करता त्यात बदल करून प्रत्येक घरकुलासाठी चार लाखांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी सांसदेत केली.

यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की, नगर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा असून घरकुलांची संख्या अतिशय कमी आहे. महागाईचा विचार करता ग्रामीण व शहरी घरकुलांसाठी देण्यात येणारा निधी अतिशय तुटपुजा आहे. घरकुलासाठी १ लाख २० हजार, शौचालयासाठी १२ हजार तर २६ ते २८ हजार रूपये मनरेगामधून अनुदान असे एकूण १ लाख ५८ हजार ते १ लाख ६० हजार असा निधी मिळतो. मात्र महागाईचा विचार करता एका घरकुलासाठी चार लाख रूपये मिळावेत अशी माझी आग्रही मागणी असल्याचे करत यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये काही बदल आवश्यक खासदार लंके यांनी नमुद केले.
ग्रामीण भागात गरीब नागरिकांकडे जागा उपलब्ध नसते. तसेच जागा उपलब्ध झाल्यास त्या जागेचा सात बारा उतारा मिळत नाही. त्यासाठी त्यामध्ये आवश्यक ती दुरूस्ती करून सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त घरकुले मिळावीत अशी विनंती करत खासदार लंके यांनी केली.
