नागपुर
सावनेर तालुक्यातील खापा येथे कन्हान नदी आहे. याच नदीकाठावर प्रसिद्ध लष्करशाह बाबाचा दर्गा आहे. त्या दर्ग्यात दर्शनाकरिता काही महिला नागपुरवरुन आलेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्यापैकी काही तरूणी या कन्हान नदीवर आंगोळीला गेल्या असताना एका तरूणीचा कन्हान नदीत बुडल्याने मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी (ता. 1) दुपारी तीनच्या सुमारास घडली. दिशा वढाई (रा. घटाटेनगर, पारडी, नागपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. दिशा सोमवारी सकाळच्या सुमारास नागपूर येथून परिवारासोबत दर्शनासाठी आली होती. दर्शन घेतल्यानंतर दिशा आपल्या मैत्रिणींसोबत येथून जवळच असलेल्या कन्हान नदीवर गेली. नदीपात्रात उतरून मैत्रिणींसोबत पोहण्याचा आनंद घेत असताना दिशा समोर-समोर जात खोल पाण्यात गेली. दिशा बुडताना दिसताच तिच्या मैत्रिणींनी तिला वाचविण्यासाठी धाव घेतली. पण तोपर्यंत ती खोल पाण्यात जाऊन बुडाली होती. मैत्रिणींनी आरडाओरडा केला असता आजबाजूच्या नागरिकांनी नदीकडे धाव घेतली. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर दिशाचा शोध लागला. दिशा खोल पाण्यात बुडाली होती. तिला नागरिकांनी बाहेर काढले व खापा येथील प्राथमिक रूग्णालयात दाखल केले. दिशाची प्रकृती गंभीर असल्याने तिला सावनेर सरकारी रुग्णालयात पाठविण्यात असता तेथील डॉक्टरांनी तपासुन तिला मृत घोषित केले. पुढील तपास स्थानिक पोलिस करत आहेत.
(प्रतिनिधि मंगेश उराड़े — एनटीवी न्यूज़ मराठी, नागपुर)