गंगापूर (प्रतिनिधी) अमोल पारखे
गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या काही आठवड्यांपासून परिसरातील अनेक पाळीव प्राणी, रानडुक्कर आणि कुत्र्यांची बिबट्याच्या हल्ल्यात शिकार होत आहे. नुकत्याच २२ जूनच्या रात्री कचरू कारभारी सुराशे यांच्या घराजवळ बांधलेल्या बकरीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

गट क्रमांक ३९, ६० आणि ६५ या शिवारातील शेतांमध्ये बिबट्याचे पायाचे ठसे व हल्ल्याचे खुणा सातत्याने दिसून येत असून, शेतकरी व ग्रामस्थ चांगलेच दहशतीखाली आले आहेत. दिवसभराची शेती करून संध्याकाळी घरी परत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता संध्याकाळचे व रात्रीचे वेळ अधिकच धोकादायक ठरत आहे.
शेतकरी भयभीत, शेतीला जाणंही कठीण
माहुली, मांजरी, मुद्देशवाडगाव,शिंगी या भागातील शेतकरी बिबट्याच्या धास्तीने शेतात जाणं टाळत असून, काही ठिकाणी शेतीतील सिंचनासाठी पाणी सोडण्यासही शेतकरी पुढे येत नाहीत. एका शेतकऱ्याने सांगितले, “रात्रीचं शेतात जाणं आम्ही आधीच बंद केलं आहे, पण आता सकाळी व संध्याकाळीही जाताना जीव मुठीत घ्यावा लागतो.”
शाळकरी मुलांच्या उपस्थितीत घट
या भागातील जिल्हा परिषद शाळांमध्येही बिबट्याच्या दहशतीचा परिणाम दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कमालीची घट झाली असून, काही पालकांनी मुलांना शाळेत पाठवणं थांबवलं आहे. शाळेच्या शिक्षकांनी सांगितले की, “गावात बिबट्या फिरतोय ही बातमी प्रत्येक पालकाच्या मनात घोंगावत आहे. त्यामुळे अनेक मुलं घरीच थांबवली जात आहेत.”
वनविभागाकडून निष्क्रियता?
इतक्या गंभीर परिस्थितीतही वनविभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. बिबट्याच्या वावराची माहिती दिली गेल्यानंतरही केवळ पथक पाठवून पाहणी केल्याचं सांगितलं जात आहे. ग्रामस्थांच्या मते, वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केलं पाहिजे.
ग्रामस्थांची संतप्त मागणी
परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर बिबट्याला पकडलं नाही, तर मोठी दुर्घटना घडू शकते. एकूणच संपूर्ण शिवारात भीतीचं वातावरण असून, ग्रामस्थ, शेतकरी व विद्यार्थी यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे.