कोणी काय खावं आणि खाऊ नये याचा निर्णय लोकांनी घ्यावा, स्वातंत्र्य दिनालाच तुम्ही बंदी कशी आणता. ही गोष्ट सरकारने सांगू नये की कोणी काय खावं आणि खाऊ नये. कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार करायला हवा, स्वातंत्र्यदिनी त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे, अशी भूमिका मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली, मालेगाव, नागपूर, अमरावती यांसह राज्यातील काही महापालिकांनी जारी केले आहेत. या निर्णयावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून या आदेशाचे स्वागत होत असताना, खाटीक समाज आणि मांसाहार करणाऱ्या नागरिकांकडून मोठा विरोध करण्यात येत आहे.
मी आमच्या लोकांना सांगितलं आहे तुम्ही चालू ठेवा म्हणून. महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकेने करू नयेत. एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आणि दुसरीकडे खायचं देखील स्वातंत्र्य नाही, म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणत आहात. तर मला असं वाटतं हाच विरोधाभास आहे. दोन गोष्टी आपण एकत्र पाळतोय. एक म्हणजे स्वातंत्र्य दिन दुसरा म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजेच प्रजेची सत्ता आणि आपण इथे स्वातंत्र्य म्हणतोय, स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही कशी काय बंदी आणत आहात आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काही सण आहेत, याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट सरकारने सांगू नये, असं मला वाटतं, कोणत्याच सरकारने सांगू नये, कोणी काय खाल्लं पाहिजे. कोणी काय नाही खाल्लं पाहिजे. मी ऐकलं १९८८ ला वगैरे हा कायदा आणला आहे, मला वाटतं हा कायदा १९८८ ला आणलेला असो किंवा आत्ता आणला असेल, मला वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. स्वातंत्र्यदिनी आपण लोकांकडून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत म्हणजे हा कोणता स्वातंत्र्य दिन असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
N Tv News Marathi🎥📷 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा : 9028903896