पंजाबमध्ये सध्या मुसळधार पावसाचा कहर आहे. पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. त्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांचा आकडा सतत वाढत आहे. शनिवारी (ता. ६) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४६ जणांचा मृत्यू झाला असून, एक लाख ७५ हजार हेक्टर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. एनडीआरएफ, बीएसएफ, लष्कर, पंजाब पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी मदत आणि बचाव कार्यात सातत्याने काम केले आहे. सतत येणाऱ्या मुसळधार पावसामुळे सतलज, बियास आणि रावी नद्यांमध्ये पूर आला आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये देखील कमी प्रमाणात विनाश नोंदला गेला आहे. पंजाबमध्ये पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. शनिवारी (ता. ६) पोंग धरणाची पाणी पातळी एक हजार ३९४ फुटापेक्षा जास्त नोंदली गेली, जे अजूनही कमाल मर्यादेपेक्षा चार फुटांपेक्षा जास्त आहे.