जालना प्रतिनिधी, १४ ऑक्टोबर :

भोकरदन (जालना) : भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत दोन आरोपींकडून सुमारे ₹७५,०८० किमतीचा अवैध दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पारध येथील रईस बुरा तडवी (रा. पारध) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी ₹२,८८० किंमतीच्या ४८ सीलबंद दारूच्या बाटल्यांचा साठा जप्त केला.

दुसऱ्या एका कारवाईत, अमोल उत्तम बर्डे (रा. पिंपळगाव रे) याच्याकडून पोलिसांनी २२ सीलबंद दारूच्या बाटल्या (किंमत ₹२,२००) आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली ₹७०,००० किमतीची एक मोटारसायकल असा एकूण ₹७२,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या दोन्ही कारवाईत मिळून पोलिसांनी एकूण ₹७५,०८० किमतीचा माल हस्तगत केला आहे. आरोपी रईस तडवी व अमोल बर्डे यांच्याविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५७/२५ व २५८/२५ प्रमाणे कलम ६५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी काटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय माने, पोलीस हवालदार संतोष जाधव, पोलीस कर्मचारी भगवान जाधव व पोलीस कर्मचारी सुनील जाधव यांच्या पथकाने केली. पारध पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

(एनटीव्ही न्यूज मराठी, भोकरदन, जालना.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *