- शिवसेना शिंदे गटाच्या १८ नगरसेवक व नगराध्यक्ष उमेदवारांची यादी जाहीर..!
जामखेड प्रतिनिधी, दि. १८ नोव्हेंबर
अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषदेची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीसाठी २४ पैकी एकूण १८ नगरसेवक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तर सौ. पायल आकाश बाफना या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. ‘ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर पूर्ण तयारीने लढणार असून, जामखेडला एक सुंदर शहर बनवणार,’ असे स्पष्ट प्रतिपादन आकाश बाफना यांनी पत्रकार परिषदेत केले.
विकासाची ब्लुप्रिंट तयार
सोमवार, दि. १७ रोजी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाने नगराध्यक्षांसह १९ उमेदवारांची (१+१८) यादी जाहीर केली. आकाश बाफना यांनी स्पष्ट केले की, जामखेड शहरात रस्त्यांचा, पाण्याचा आणि लाईटच्या प्रश्नांसह अनेक गंभीर समस्या आहेत. या सर्व समस्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी विकासाची ब्लुप्रिंट तयार करण्यात येणार आहे.
विरोधकांकडून दबाव आणि आमिष
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने यांनी गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “आमच्या काही उमेदवारांवर दरम्यान विरोधकांकडून दबाव आणण्यात आला आहे.” पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आकाश बाफना यांनीही यावर दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, शिवसेनेच्या वतीने आम्ही एकूण २४ उमेदवार जाहीर केले होते, परंतु विरोधकांनी दबाव व आमिष दाखवून सहा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. मात्र, कोणाच्याही दबावाला बळी न पडता सर्व उमेदवार जिंकून दाखवू आणि ज्या ठिकाणी उमेदवार नाहीत, तेथे अपक्षांना पुरस्कृत करून सोबत घेऊन निश्चित विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जामखेडकरांना नवा चेहरा मिळाला
उमेदवार शामिरभाई सय्यद यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “जामखेडकरांना नवा चेहरा हवा होता आणि तो चेहरा नगराध्यक्षा पदासाठी पायलताई आकाश बाफना यांच्या माध्यमातून मिळाला आहे. आम्ही सर्वच १९ उमेदवार जिंकून दाखवू,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने सर, युवा सेना तालुकाप्रमुख प्रविण बोलभट, नितीन कोल्हे, संतोष वाळुंजकर, आण्णा ढवळे, दिनेश राळेभात, गणेश आजबे, शामिरभाई सय्यद, विकी पिंपळे, शिवाजी विटकर, शिवकुमार डोंगरे, मोहन देवकाते, प्रदीप बोलभट सह सर्व उमेदवार उपस्थित होते.
प्रतिनिधी नंदु परदेशी,
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.
