
जाफराबाद, जालना (दि. ०६/१२/२०२५)
जालना: भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या महान कार्याला वंदन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शाम सर्जे यांनी भूषविले, तर महाविद्यालयाचे प्रा. मनिष बनकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा. अनिल वैद्य यांनी उपस्थितांकडून त्रिशरण पंचशील वदवून घेऊन आदरांजली वाहिली.
डॉ. आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. मनिष बनकर यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच, डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या रूपाने देशातील सामान्य जनतेला कसा न्याय मिळवून दिला, हे प्रभावीपणे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शाम सर्जे यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशात विविध प्रकारचे जे कार्य केले आहे, ते देश विसरूच शकत नाही.”
भीमगीत आणि समारोप
याच कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. अनिल वैद्य यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमगीत गाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष पहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप पाटील यांनी केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांचीही विशेष उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना:
