- गोपनीय माहितीनंतर पोलीस विभाग व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची उत्तम कामगिरी..!
- तपासात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता..!

नागपूर प्रतिनिधी, (दि. १० डिसेंबर)
सावनेर, नागपूर: दिनांक ९ डिसेंबर २०१५ च्या मध्यरात्री, अंदाजे २ वाजता केळवद परिसरात अत्यंत धक्कादायक आणि गंभीर असा ५० गोवंशाच्या अवैध तस्करीचा मोठा मामला उघडकीस आला आहे. बैतुलहून नागपूर दिशेने वेगाने येत असलेल्या कंटेनर क्रमांक RJ14-GE-6623 मध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे चेतन दादा हेलोंडे यांनी धाडसी कारवाई केली.
केळवद पोलीस स्टेशन यांना विश्वसनीय माहितीच्या आधारे सूचित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय बजरंग दल – सावनेर व कळमेश्वर शाखेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत संयुक्त पथक तयार करून कंटेनरचा पाठलाग सुरू केला.
मध्यरात्री दोनच्या सुमारास योग्य ठिकाणी नाकाबंदी करून कंटेनरला थांबवण्यात आले.
अमानुष अवस्थेत ५० गोवंश
कंटेनरची तपासणी केली असता पथकाला हादरवून टाकणारे चित्र समोर आले. कंटेनरमध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून ठेवलेले २ गायी आणि ४८ नर गोवंश असे एकूण ५० गोवंश जिवंत, पण गंभीर अवस्थेत आढळून आले. हलण्याइतकीही जागा नसताना, दमछाक होणाऱ्या परिस्थितीत, श्वास घेणे कठीण अशा अवस्थेत त्यांची वाहतूक केली जात होती. अनेक गोवंशांच्या अंगावर जखमा आणि ओरखडे असल्याचे दिसून आले.

गौरक्षक आणि पोलिसांची कामगिरी
ही घटना गोवंश तस्करीचा गंभीर आणि संघटित प्रकार असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. या कारवाईत राष्ट्रीय बजरंग दल (चेतन भाऊ हेलोंडे यांच्या नेतृत्वाखाली) आणि केळवद पोलीस यांनी अत्यंत तत्परता दाखवली.
या कारवाईत अग्रेसर असलेले राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते: चेतन भाऊ हेलोंडे (विधानसभा उपाध्यक्ष), मनीष भाऊ राऊत (सावनेर विधानसभा अध्यक्ष), मंगेश भाऊ गमे (कळमेश्वर तालुका अध्यक्ष), दिनेश पांडे, महेश चरपे, शुभम राजपूत, निलेश रोडे, हुकूम मालवी, हर्षल मोहटे, आकाश धूरई, प्रणय ठाकरे, मनीष सोनवाणे, सागर चरडे, मंगेश सेलोटे, तुषार सावरकर, आशिष, शिवम, हर्षु, अर्जुन, राजेश आणि समस्त गौरक्षक टीम सावनेर, खापा, पारशिवणी आणि रामटेक या सर्वांनी धोक्याची पर्वा न करता तात्काळ कृती केली, अशी माहिती मिळत आहे.
पोलिसांचा मोलाचा सहभाग: ठाणेदार आशिषजी ठाकूर, पीएसआय अरुण राठोड, पीएसआय सुरज परमार, हेड कॉन्स्टेबल दिनेश काकडे, महेश डंबारे आणि होमगार्ड सैनिक सुनील (१८२०) यांनी या कारवाईत मोलाचे योगदान दिल्याचे समजते.
पुढील तपास आणि कारवाई
पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन चालक व संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. सर्व ५० गोवंशांना रावळगाव येथील जैन गौशाळेत सुरक्षितपणे हलविण्यात आले असून, त्यांच्यावर तात्काळ उपचार व देखभाल सुरू आहे. या घटनेमागे मोठा आर्थिक साखळी आणि मास्टरमाईंड असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस तपासात लवकरच मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले असून, अशा संघटित गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
प्रतिनिधी मंगेश उराडे,
एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर.
