• मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विकास देशमुख यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राष्ट्रीय महागौरव पुरस्कार प्रदान.
  • केईएम हॉस्पिटलमध्ये निस्वार्थ सेवा आणि ६६ लाखांहून अधिक रुग्णांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल गौरव.
  • मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात १०० कोटींहून अधिक क्लेम सेटलमेंटचा ऐतिहासिक विक्रम.
  • कोविड योद्धा म्हणूनही राज्यपालांच्या हस्ते यापूर्वी सन्मानित; ‘योजना म्हणजे हक्क’ ही संकल्पना केली यशस्वी.

MUMBAI | मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आणि सी. एस. क्रिएटिव सोल्यूशन्सचे संस्थापक श्री विकास ज्ञानू देशमुख यांना पणजी येथे पार पडलेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते “राष्ट्रीय महागौरव पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला.

गोवा कला अकादमीच्या शानदार सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात विकास देशमुख यांच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. मुंबईतील अवघ्या ७ बाय ८ च्या खोलीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. या सोहळ्यास गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळ देसाई, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, आयुष्मान भारत मिशनचे डॉ. ओमप्रकाश शेटे आणि डिजिटल मिडिया संघटनेचे राजा माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून समाजसेवेचा मार्ग निवडणाऱ्या विकास देशमुख यांनी केईएम रुग्णालयात विनामूल्य सेवा देताना आरोग्य योजनांमधील त्रुटी ओळखून एक नवीन ‘इम्पलिमेंटेशन मॉडेल’ विकसित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत ६६ लाख ७० हजारांहून अधिक रुग्णांना लाभ मिळाला असून ३५ हजार कोटींहून अधिक क्लेम सेटलमेंट करण्यात आले आहेत. १२ हून अधिक राज्यांमध्ये त्यांनी आपल्या सेवेचा विस्तार केला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एका वित्तीय वर्षात १०० कोटींहून अधिक क्लेम यशस्वीरीत्या मिळवून देण्याचा ऐतिहासिक विक्रमही त्यांच्या नावावर आहे. १५० पेक्षा अधिक आरोग्य शिबिरे, सावली केअर सेंटरचे संचालन आणि लाखो आयुष्मान कार्डांचे वाटप त्यांनी केले आहे. कोविड काळात धारावी आणि नेहरूनगर सारख्या भागात जीवाची पर्वा न करता त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना ‘कोविड वॉरियर’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. “शासकीय योजना हे दान नसून तो नागरिकांचा हक्क आहे,” या भावनेतून ते आजही अविरत कार्य करत आहेत.


प्रतिनिधी, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *