• यावल शहरातील कचरा संकलन सेवा ठप्प
  • आठ ते दहा दिवसांपासून कचरा संकलन बंद
  • विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले
  • दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
  • स्वच्छ भारत मिशनची सेवा पूर्ववत करण्याची मागणी
  • आंदोलनाचा भाजप नगरसेवकांचा इशारा

JALGAON | यावल शहरात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सुरू असलेले घराघरातील कचरा संकलन गेल्या ८ ते १० दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त असून, कचरा संकलन सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांकडून जमा होणारा कचरा रस्त्याच्या कडेला तसेच परिसरात टाकला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली असून दुर्गंधी निर्माण झाली आहे. तसेच डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

या पार्श्वभूमीवर भाजपाच्या गटनेता सौ. नंदा राजेंद्र महाजन यांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन घराघरातील कचरा संकलन व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी, तसेच रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी केली आहे.
शहरातील नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रश्नावर तातडीने योग्य ती कार्यवाही न झाल्यास भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नंदा राजेंद्र महाजन यांनी दिला आहे.
यावेळी नगरसेवक बाळु फेगडे, योगेश चौधरी, उमेश फेगडे, कदीर खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *