पुण्यनगरीच्या ऐतिहासिक आणि भक्तीमय गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करत, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रींची आरती करून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. याप्रसंगी आमदार हेमंत रासने आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, बाप्पाचा वरदहस्त सर्वांवर सदैव राहो, अशी प्रार्थना केली.
यानंतर त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी मित्र मंडळातील श्री गणरायाचेही सपत्नीक दर्शन घेतले आणि मनोभावे आरती केली. बाप्पाच्या मंगलमूर्तीचे दर्शन घेताना मनाला विलक्षण समाधान लाभल्याचे सांगत, विघ्नहर्त्या बाप्पाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, आरोग्य, सुख-समृद्धी आणि यश नांदो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
यानंतर ऐतिहासिक ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये विराजित श्री गणरायाचे त्यांनी सपत्नीक भावपूर्ण दर्शन घेतले. महोत्सवाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी सर्वांसह भक्तिमय वातावरणात महाआरती केली आणि गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई आणि पुणे फेस्टिव्हलचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
