नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील खंडाळा येथे गोठ्यात बांधलेल्या गोऱ्यावर वन्यप्राण्याने हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. गोऱ्याला सुमारे ५०० मीटर फरफटत नेण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा येथे सोमेश गोनमारे यांच्या गोठ्यात गोरा बांधलेला होता. रविवारी रात्री सुमारे दीड वाजता ते भजन करून घरी परतले, त्यावेळी गोरा गोठ्यात होता. मात्र सोमवारी सकाळी गोरा दिसला नाही. शोध घेतला असता घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील शेतातील झुडपात गोऱ्याची शिकार झालेली आढळली.

घटनास्थळी आढळलेल्या पायांच्या ठशांवरून हा हल्ला वाघाने केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र वनविभागाच्या पाहणीनंतरच हल्लेखोर वन्यप्राण्याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

मागील काही दिवसांपासून बिना संगम, भानेगाव, डोरली आणि साहोली परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मागील महिनाभरात जनावरांवरील हल्ल्यांच्या सुमारे नऊ घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून अधिकारी घटनास्थळी पाहणी करीत आहेत. वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिक आणि पशुपालकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *