♦️ खापा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या हस्ते साहित्य वाटप
♦️ पाच सर्पमित्रांना रेस्क्यू साहित्याचे वितरण
♦️ स्नेक रेस्क्यू हुक, बॅग आणि हेडलॅम्प
♦️ सर्प बचाव करताना दक्षता बाळगण्याच्या सूचना
♦️ सापांसोबत स्टंट करणाऱ्यांना वनविभागाचा इशारा
♦️ साप दिसल्यास १९२६ वर संपर्क साधण्याचे आवाहन

NAGPUR | नागपूर जिल्ह्यातील खापा वनपरिक्षेत्रात मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासोबतच सर्प बचावाचे कार्य अधिक सुरक्षित करण्यासाठी वनविभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावने यांच्या हस्ते कार्यरत सर्पमित्रांना आवश्यक रेस्क्यू साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत खापरखेडा येथील सर्पमित्र दद्दू गणवीर, मयूर कनोजे आणि रजत गुप्ता, तसेच खापा वनपरिक्षेत्र हद्दीतील सर्पमित्र विशाल शेंडे आणि प्रेम खडसे यांना स्नेक रेस्क्यू हुक, रेस्क्यू बॅग आणि हेडलॅम्प आदी साहित्य देण्यात आले.
यावेळी सर्पमित्रांना साप पकडताना दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वतःची, नागरिकांची आणि सापाची सुरक्षितता महत्त्वाची असून, सापांसोबत खेळ, प्रदर्शन किंवा स्टंट करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले.
मानवी वस्तीत आलेल्या सापांना इजा न करता सुरक्षितपणे वाचवून मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यात जबाबदार सर्पमित्रांची महत्त्वाची भूमिका आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन करत सर्पमित्रांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
वनविभागाच्या मार्गदर्शनाबाहेर नियमांचे उल्लंघन करून साप पकडणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांच्यासोबत स्टंट करणे टाळावे. वन्यजीव संरक्षणविषयक नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला.
नागरिकांनी साप दिसल्यास स्वतः पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्यावी. साप किंवा वन्यजीव आढळल्यास १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | खापा, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *