जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मनवेल येथे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभाग आणि शाळा प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मनवेल येथील अंगणवाडी, आश्रमशाळा, श्री भुवनेश्वरी विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्या नेतृत्वाखाली आणि साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. मुकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्य विस्ताराधिकारी डी. सी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना जंतसंसर्गापासून बचाव, शारीरिक वाढ आणि पोषणासाठी जंतनाशक गोळ्यांचे महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी आरोग्य सेवक सरदार कनासा, आशा वर्कर रंजना कोळी, पूनम पाटील आणि ज्योती मोरे उपस्थित होते. तसेच भुवनेश्वरी शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील, आश्रमशाळेच्या स्त्री अधीक्षिका सरिता तडवी, मुख्याध्यापिका संगीता पाटील आणि शिक्षक दीपक चव्हाण व प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
