AKOLA | अकोला जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसीच्या विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल घेत अकोला एमआयडीसीचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे.
यावरून भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी विरोधकांवर टीका केली. सत्ता नसल्यामुळे हताश झालेल्या उबाठा सेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांकडून सरकार व लोकप्रतिनिधींवर खालच्या स्तरावरील वक्तव्ये करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बोरगाव विस्तारित एमआयडीसीच्या संदर्भात लोकप्रतिनिधींची अडीचशे एकर जमीन असल्याचा दावा करणाऱ्यांनी संबंधितांची नावे आणि सातबारे जनतेसमोर मांडावेत, असे आव्हान शिवरकर यांनी दिले.
अकोला शहर आणि जिल्ह्यात अनेक समस्या असताना विकासकामांसाठी सरकारकडे सकारात्मक पाठपुरावा करण्याऐवजी विरोध करणे हाच विरोधकांचा धंदा असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांकडे निधी मागायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच नावाने टीका करायची, ही भूमिका निंदनीय असून लोकशाहीसाठी घातक असल्याचे शिवरकर म्हणाले.
बोरगाव एमआयडीसी प्रकरणात आरोप करणाऱ्यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि तथाकथित सल्लागाराने हिंमत असेल तर लोकप्रतिनिधींची नावे आणि सातबारे जनतेसमोर आणावेत; अन्यथा अकोला जिल्ह्यातील नागरिकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी संतोष शिवरकर यांनी केली.
#Akola #AkolaMIDC #MIDCExtension #BorgaonMIDC #AkolaNews #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #RandhirSavarkar #AnupDhotre #SantoshShivarkar #BJP #NTVNewsMarathi #अकोला #एमआयडीसी #महाराष्ट्रबातम्या #राजकीयबातमी
