पुणे : मानव- वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभाग व रेस्क्यू चॉरिटेबल ट्रस्ट बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ‘वन्यजीव जनजागृती कार्यशाळा’ उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात १५ जुलैपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंदापूर, बारामती, पौड, वडगाव मावळ, शिरोता, पुणे, भांबुर्डा विभागात असणारे महाविद्यालय, शाळा, स्थानिक समुदाय, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीच्यादृष्टीने दौंड वनपरिक्षेत्रा पासून या उपक्रमाची सुरूवात झाली आहे.
दौंड वनपरिक्षेत्रांतर्गत आठवड्याच्या कालावधीत १० शाळा व महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिक असे एकूण १ हजार ८४० नागरिकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. कार्यशाळेत रेस्क्यू टिमच्यावतीने विविध प्रजातीच्या प्राण्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नाग, घोणस, फुरसे, मण्यार यासारख्या विषारी सापांची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली. बिबट प्रवण क्षेत्रात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अधिकाधिक शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिकांनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे पुणे