सिंधुदुर्ग : महाराष्ट्र गोवा कर्नाटक अशी त्रिवेणी संगम असलेल्या राज्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले तिलारी धरण व आजूबाजूला असलेली रोजगाराची साधने विकसित करून रोजगार निर्माण करावा, अशी मागणी घेऊन स्थापित झालेल्या ‘तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंच’ला आता गावागावातून मोठा पाठिंबा मिळत आहे.अवघ्या आठ दिवसात साडेतीनशेहून अधिक सदस्यांनी नोंदणी केली असून सरपंचांनी पाठिंबा दिला आहे.

तिलारी येथे आंतरराज्य धरण प्रकल्प आहे, वीज निर्मिती केंद्र तसेच त्याठिकाणी जैवविविधता अगणिक आहे. मात्र हा भाग ओसाडच का राहिला? असा सवाल सर्वांचाच पडला असून ‘आमची तिलारी जगात भारी, पण पर्यटनासाठी कधी खुली?’ हा प्रश्न घेऊन या मंचने चळवळ उभी केली आहे. तिलारीत मंचाने सुचविलेली कामे पूर्ण झाल्यास संपूर्ण दोडामार्ग तालुका रोजगाराचे केंद्र बनेल. त्यासाठी विविध स्तरातून अधिक पाठिंबा मंचाकडे लेखी सादर करावा. शिवाय राजकीय प्रतिनिधींनी मंचाच्या मागण्या विचारात घेऊन आपापल्या पक्षाच्या वरिष्ठाकडे पाठपुरावा करावा आणि युवक-युवतींना रोजगाराचे दालन खुले करावे, अशी मंचाची मागणी आहे.