पुणे : वाचनसाखळी समुहाच्या वतीने वाबळेवाडी ता.शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, साहित्यिक सचिन बेंडभर यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
वाचनसाखळी समुहातील आपण एक उत्कृष्ट वाचक व लेखक वाचन छंद जोपासत ‘ तारूण्याच्या पायरीवर’ उत्कृष्ट पुस्तक परिचय लिहून वाचन संस्कृती वाढीसाठी महत्वपूर्ण योगदान देत आहात. आपल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल व सहभागाबद्दल आपणास वाचनसाखळी समुह महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत असल्याचे संयोजिका श्रीमती प्रतिभा लोखंडे, सहसंयोजक रविंद्रकुमार लटिंगे, कार्याध्यक्ष गणेश तांबे यांनी म्हटले आहे.
साहित्यिक सचिन बेंडभर यांची व्हऊ द्याकी वाजवून….! ही कथा तसेच दुनिया करा रे एक सारी ही कविता एन टी व्ही न्यूज चॅनेलच्या ‘वास्तव’ द रिऍलिटी दिपावली विशेषांक २०२२ मध्ये नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.
वाचन साखळी समुहाच्या वतीने गौरविण्यात आल्याबद्दल वाचन साखळी समुहाची माहिती देताना तसेच प्रतिक्रिया व्यक्त करताना साहित्यिक सचिन बेंडभर यांनी म्हटले,
आजच्या तंत्रज्ञान युगात टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर या साधनांमुळे वाचन कमी पडले आहे, अशी तक्रार आपल्याला नेहमी ऐकायला मिळते. प्रत्येक जण तक्रारीचा पाढा वाचतो पण यातून मार्ग काढण्यासाठी उपाय शोधत नाही. पण ही किमया साधली आहे नागपूर येथील वाचन प्रेमी प्रतिभाताई लोखंडे यांनी. जर सकारात्मक विचार केला तर ज्या तंत्रज्ञानामुळे वाचन कमी झाले आहे त्याचाच वापर करून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व ती वृद्धिंगत करण्यासाठी कार्य केले जाऊ शकते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
वाचन साखळी हा महाराष्ट्रातील कवी, लेखक, साहित्यिक आणि वाचकांचा एक आगळावेगळा समूह आहे. यात सर्व साहित्यप्रेमींचा समावेश आहे. नागपूर येथील आदर्श शिक्षिका, लेखिका व वाचनप्रेमी माननीय सौ. प्रतिभा लोखंडे यांनी हा समूह वाचन संस्कृती वाढविण्यासाठी बनवला आहे. या समूहात पुस्तकाचे वाचन करून त्या पुस्तकावर लेखक कवी व समीक्षक पुस्तक परीक्षण करून पाठवतात. त्यावर वाचकांचा उदंड प्रतिसाद येतो. यातूनच वाचन साखळी समूहातील संपादक मंडळ निवडक समीक्षणाचे पाच क्रमांक काढतात. पहिल्या पाच येणाऱ्या विजेत्यांना पुस्तक देऊन गौरविण्यात येते. ही पुस्तके प्रतिभाताई लोखंडे समूहातील लेखकांकडून विकत घेऊन निवड झालेल्या लेखकांना पोस्टाने भेट म्हणून पाठवतात.
गेली पाच वर्षापासून प्रतिभाताईंनी हा समूह सर्व वाचक प्रेमी व साहित्यिकांना एकत्र घेऊन चालवला आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अशा प्रकारेही यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केले आहे. दर महिन्याला चांगले परीक्षण करणाऱ्या पाच परीक्षकांची निवड केली जाते व त्यांना पोस्टाने पुस्तके पाठवली जातात एवढेच नव्हे तर शंभर पुस्तकांचे परीक्षण करणाऱ्या समीक्षकाचा समूहाकडून सन्मान करण्यात येतो. हा सन्मान प्रतिभाताई स्वतः समीक्षकाच्या घरी जाऊन करतात. अशाप्रकारे वाचक आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रतिभाताईंनी गेल्या पाच वर्षापासून सुरू केले आहे आणि त्याचा आता वटवृक्ष झाला आहे.
या महिन्यात माझ्या ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर’ या प्राध्यापक देवबा पाटील यांच्या पुस्तकावर केलेल्या माझ्या समीक्षणाला प्रथम क्रमांक दिल्याबद्दल वाचन साखळी समूहाचे मी ऋण व्यक्त करतो. प्रतिभाताईंनी निर्माण केलेला वाचन साखळी समूह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाचन संस्कृती वृद्धिंगत होवो, अशी सदिच्छा साहित्यिक सचिन बेंडभर या़ंनी व्यक्त केली.
