पुणे : वढू खुर्द ( ता.हवेली ) येथील उपक्रमशील शिक्षिका, शिष्यवृत्ती तज्ञ व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मिना अशोक म्हसे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, फुलगाव येथे लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, दिपक पायगुडे यांच्या हस्ते लोकसेवा गुणवंत गुरुजन पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. लोकसेवा प्रतिष्ठान ,नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल फुलगाव , पुणे जिल्हा पदवीधर ,प्राथमिक शिक्षक ,केंद्रप्रमुख संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकसेवा गुणवंत गुरूजन,विद्यार्थी सन्मान सोहळा नुकताच पार पडला यावेळी मीना म्हसे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रेय वारे,महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे राज्य सरचिटणीस अनिल पलांडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे च्या वतीने सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवेली तालुक्यातील वढू खूर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यंदाच्या वर्षाचा शिष्यवृत्ती निकाल शंभर टक्के लावत दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीत आले असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विश्वास राम जयस्वार ( २४० ), पवन मुन्ना लाल गौतम ( २३८ ) या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित करत यशाची उज्वल परंपरा कायम राखत उत्तुंग यश मिळवले.उपक्रमशील शिक्षिका, शिष्यवृत्ती तज्ञ व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मिना अशोक म्हसे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.याआधी तीन वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत याच शाळेतील पाच मुले शिष्यवृत्तीत लावत गेली साठ वर्षात प्रथमच मीना अशोक म्हसे यांनी शिष्यवृत्तीची परंपरा वढू खुर्द शाळेत सुरू केली. त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर शिक्षकांनीही शिष्यवृत्तीची सुरुवात केली. यावर्षी शिष्यवृत्तीची परंपरा खंडित होऊ न देता त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सरपंच मोहिनी भोंडवे, उपसरपंच नवनाथ पवळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खंडू भोंडवे, माजी सरपंच माऊली चोंधे, विलास खांदवे, अनिल चोंधे, नितीन भोंडवे, सचिन भोंडवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
