वाशिम :- जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गावाचे जवान योगेश सुनिल आडोळे यांचे काल रात्री ९ वाजताच्या सुमारास कारंजा-मंगरुळपिर महामार्गावर पोटी फाट्याजवळ अपघात होऊन निधन झाले आहे. योगेश हे भारतीय सैन्य दलात मागील चार वर्षांपासून कार्यरत होते.

भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे व्रत घेलेले २४ वर्षीय योगेश सुनील आडोळे हे जम्मू काश्मीर मधील राजुरी येथे सेवा देत होते. २०१९ साली ते सैन्यात दाखल झाले होते. महिन्याभराची सुट्टी घेऊन योगेश दोन दिवसांपूर्वीच गावी परत आले होते. काल दुपारी मित्रांसोबत एका लग्न समारंभात गेल्या नंतर सायंकाळी ते गावी परतले व रात्री काही साहित्य घेण्यासाठी महामार्गावर आले होते. त्याच दरम्यान मंगरुळपिर वरून कारंजा कडे जाणाऱ्या एम एच २७ बी एक्स ११९१ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात योगेशला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या योगेशने प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. योगेश हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता.योगेशच्या घरची परिस्थिती जेमतेमच असून त्याच्या पगारावरच घर चालत होते. त्यांच्या पश्चात घरी आई एकटीच राहते तर लहान बहीनीचे लग्न झाले आहे. योगेशच्या परिवारासह संपूर्ण गावावर मोठी शोककळा पसरली आहे. पूलगाव येथील सैन्याचे अधिकारी गावात दाखल झाले असून सर्व प्रकिया पार पाडल्यानंतर त्यांच्यावर धोत्रा ह्या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206