आठ महिन्यात मालाविरुद्धचे व इतर महत्त्वाचे १२७ गुन्हे उघडकीस आणून १९४ आरोपींना केली अटक
सुमारे ६० लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या ८ महिन्याच्या कालावधीत कोतवाली पोलिसांनी धडक कारवाया करून १२७ गुन्ह्यातील १९४ आरोपींना जेरबंद केले आहे. अवैध धंद्यांमधील व चोरीला गेलेला ५९ लाख ६९ हजार ८९७ रुपये किमतीचा मुद्देमाल कोतवाली पोलिसांनी हस्तगत केला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी गणेशोत्सव निमित्त घेतलेल्या आढावा बैठकीत कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, अवैध शस्त्रे, गांजा, गुटखा पानमसाला, गोवंश अशा १२७ गुन्ह्यात १९४ आरोपींना गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. यामध्ये कोतवाली पोलिसांनी बस स्थानक परिसरात तसेच रेल्वे स्टेशन परिसरात अट्टल गुन्हेगारांनी नागरिकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून लुटले होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करून जेरबंद केलेल्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. त्यासोबतच महिला व मुलींची छेड काढणारे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे, विनापरवाना वाहन चालविणारे, रात्रीच्या वेळी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे ठाणेदार उपस्थित होते.