शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून “स्व. अनिलभैय्या राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार” अशी पोस्ट केली आहे. जवळपास हजार लोकांनी ही पोस्ट गुरुवार सकाळपर्यंत लाईक केली असून या पोस्ट वरून आता नेटकऱ्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलेच वॉर रंगू लागल आहे. कालच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या जाहीर झालेल्या यादीमध्ये नगर दक्षिणेतून सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर काळे यांनी ही पोस्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे लंके उमेदवार झाल्यास विखे विरुद्ध लंके असा सामना रंगणार अशा चर्चा झडू लागल्या आहेत. त्यापूर्वीच काळे यांनी सूचक पोस्ट करत मागील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला अनिल राठोड यांच्या विरोधात सुजय विखे यांनी केलेल्या कामाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस नगर शहरात सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्मथक आमने सामने येत काळे यांच्या फेसबुक वॉल वरून एकमेकांना विरोध करताना पाहायला मिळत आहेत. आता हीच वेळ आली आहे गद्दारीचा बदला प्रत्येक शिवसैनिक घेणार म्हणजे घेणारच. आम्ही तर वाटच बघत होतो बदला घ्यायची. हीच खरी माननीय आमदार अनिलभैय्यांना श्रध्दांजली आसणार, असे महाविकास आघाडीचे समर्थक म्हणत आहेत. त्यावर महायुतीच्या समर्थकांकडून उड्डाणपूल, बायपासचा विकास पाहून मतदान करा. नगरकरांनी उगाच कोणाच्या नादी लागून विरोध करू नका, असे आवाहन केले जात आहे.