प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
वाशिम:-जल जीवन मिशन अंतर्गत स्पर्धा जिंकुन तुम्ही केवळ 50 टक्के विजय मिळवला आहे, गावात उभ्या राहणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या लोकवर्गणीसाठी जेंव्हा लोकांमध्ये जाऊन जागृती कराल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही विजयी ठराल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले. जल जीवन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला, निबंध, वक्तृत्व आणि लघुपट स्पर्धेत विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरणादरम्यान (दि.12) ते बोलत होते. जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदिश साहू यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले कि, “भविष्यातील पाण्यासाठी संघर्ष टाळायचा असेल तर प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित असायला पाहिजे. पाणी पुरवठा योजना कार्यान्वित नसलेल्या गावात जल जीवन मिशन मधुन पाणी योजना साकारण्यात येत आहेत. त्यासाठी 10 टक्के लोकवाटा गोळा करणे आवश्यक असुन यासाठी विजेत्या स्पर्धकांनी योगदान द्यावे. अशा विजयी स्पर्धकांना ‘जलदूत’s म्हणुन दर्जा देण्यात येणार आहे.” आपल्या परिसरातील अथवा गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी 10 टक्के लोकवाटा गोळा करण्यासाठी आपले कौशल्य पनाला लावण्याचे आवाहनही सीईओ वैभव वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना केले.
जल जीवन मिशन मधुन जिल्ह्यात एकुण 572 गावांमध्ये योजना साकारत आहेत. यामाध्यमातुन प्रत्येक घरी नळ कनेक्शन देऊन गावातील प्रत्येक व्यक्तीला दरदिवशी 55 लिटर पिण्याचे पाणी पुरवण्यात येणार आहे.
लोकवाटा दिल्यास आपलेपणाची भावना:
एखाद्या वस्तूची किंमत मोजल्याशिवाय त्याचे महत्त्व कळत नाही, यासाठी दहा टक्के लोकसहभाग गोळा करणे महत्त्वाचे आहे. पाणी पुरवठा योजनांसाठीचा शंभर टक्के खर्च शासनाने स्वतः केला असता. पण त्यामुळे नागरिकांना पाण्याची महत्त्व कळले नसते. 10 टक्के लोकवर्गणी भरल्यामुळे योजनांविषयी लोकच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसाठी गावकऱ्यांनी 10 टक्के लोकवर्गणीच्या माध्यमातुन सहभाग मिळवण्यासाठी जे स्पर्धक यशस्वी होतील तेच खरे जलदूत ठरतील अशी भूमिका जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने घेण्यात आली आहे.