कर्जत/जामखेड
कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने उन्हीळी पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी डाव्या कालव्यातून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून कालव्यातून पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. येत्या काही दिवसात कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याच आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मतदारसंघातील पाण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. त्यातही कर्जत-जामखेड मतदारसंघातील कुकडी कालवा हा महत्त्वाचा असून ५४ गावांमधील शेती या कालव्यावर अवलंबून आहे. ही गावे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्यासाठीही सर्वस्वी कुकडी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढल्याने पाण्याची पातळी खालावली आहे परिणामी वेळेत पाणी न मिळाल्यास चारा पिके, फळबागा आणि उन्हाळी हंगामातील इतर पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. याशिवाय पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कर्जत-जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जेव्हा जेव्हा पाणी टंचाई जाणवली रोहित पवार यांनी शासकीय मदतीची वाट न बघता टॅंकर सुरू केले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात नागरिकांना पिण्यासाठी तसेच जनावरांनाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी १९४ पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. यासाठी रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयात वेगळा पाणीटंचाई कक्ष स्थापण करण्यात आला असून ग्रामस्थांनी मागणी केल्यास त्याची तातडीने दखल घेऊन त्या गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील दौऱ्यावर असताना ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी पाण्याची सोय करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली. त्यानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पत्र देऊन दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. दरम्यान, कुकडी डावा कालव्यासोबतच सीना धरणात भोसे खिंड येथून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यानुसार भोसे खिंडीतून सीना धरणात पाणी सोडण्याचीही मागणी या पत्रात केली आहे.
कुकडीचे पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले त्यावेळीही ते ४० दिवसांचेच असावे असा आग्रह आमदार रोहित पवार यांनी धरला होता. सर्व गावांना पाणी मिळण्यासाठी ४० दिवसांचे आवर्तन गरजेचे आहे अन्यथा सर्व गावांना पाणी मिळणार नाही आणि लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल याची कल्पनाही त्यांनी दिली होती. तसेच मे अखेरीस किंवा जून महिन्याच्या आसपास आणखी एक आवर्तन सोडण्याचा मुद्दाही त्यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मांडला होता.
————-…
कोट
‘‘यंदा दुष्काळसदृष्य परिस्थिती असून मतदारसंघात सर्वत्र पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. या संभाव्य परिस्थितीतची जाणीव झाल्यानेच २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही ही बाब मी निदर्शनास आणून देत उन्हाळी आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानुसार कुकडीचं दुसरं आवर्तन सोडण्याची गरज आहे आणि त्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे.’’
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
नंदु परदेशी
एन टी व्ही न्युज मराठी महाराष्ट्र
जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर
मो नं 9765886124