अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक जारी केले आहे.

नगर जिल्ह्यात सभा, महासभा, आंदोलनाच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, भाले, दंडुके, बंदुका आदी वस्तू बाळगण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी आहे. सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.

हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. त्यांना लागू होणार नाही. तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, सभा, मिरवणूका, लग्न समारंभासाठी ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
