पानगावच्या महामार्गावरच्या चिखलात अडकल्या लाल परी
पानगाव :
रेणापूर तालुक्यातून गेलेल्या उमरगा- खामगाव 361 एच या हायवेवर दोन एस.टी. बस घसरल्या. चालकांची प्रसंगावधान राखत नियंत्रण केल्याने प्रवाशी बालंबाल बचावले.
रस्त्याचे काम गेली कित्येक महिने रखडले असून या रस्त्यावर वाहनधारकांचे बेहाल होत आहेत. अशातच मंगळवारी (दि.१०) सकाळी ७.४५ वा.गंगाखेड ते लातूर जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. (क्र. एम.एच.०६/एस.८७७३) बस पानगाव येथील पन्नगेश्वर कारखान्याजवळ चिखलातच अडकली तर
सकाळी १० वा. अहमदपूर आगाराची बस (एम.एच.२०/बी.एल.२०६९) लातूरकडून अहमदपूरकडे जात असताना त्याच परिसरात अडकली.
महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी टाकलेली गिट्टी उचलण्यासाठी टिप्पर थांबल्याने एस.टी. चालकाने एस. टी. उजव्या बाजूने लातूरकडे नेण्याचा प्रयत्न चालविला असतानाच पुढील बाजूचे टायर रस्त्यांकडेला चिखलात घसरुन बस अडकली. एस.टी. रस्त्याखाली जाण्याची शक्यता असतानाच एस. टी. चालकाने एस. टी. नियंत्रण करुन त्याच ठिकाणी बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. या बसमध्ये ज्येष्ठ नागरीक, विद्यार्थी, महिला व दवाखान्याकरिता निघालेले पेशंट या सर्वांना खाली उतरवले. या प्रवाशांचे हाल झाले. त्यानंतर लागलीच सकाळी १० वा. अहमदपूर आगाराची गाडी (क्रमांक एम.एच.२०/ बी.एल.२०६९) लातूरकडून अहमदपूरकडे जाताना पन्नगेश्वर शुगर मिल्स या कारखान्याजवळ चिखलात घसरुन रस्त्याखाली सरकली. थोडक्यात मोठी हानी टळली. या एस. टी. बसमधील प्रवाशी खाली उतरले.
यावेळी रस्त्यावर दोन्ही कडेच्या बाजूने वाहने जाम झाली होती.
यावेळी एसटी बसमधून उतरलेल्या प्रवाशांनी चिडून ‘पानगावचा रस्ता झालाच पाहिजे, झालाच पाहिजे!’ अशा घोषणा दिल्या.