
♦️‘मनोज जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना मीडियामध्ये राहायचं आहे’,असं मोठं वक्तव्य गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर काही मागण्या पुर्ण व्हाव्या,यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. सरकारला यावेळी गुडघ्यावर टेकवल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे. याच वक्तव्याचा समाचार परिणय फुके यांनी घेतला.ते गोंदियामध्ये माध्यमांशी बोलत होते. आमदार फुके पुढे म्हणाले की, मनोज जरांगे जे बोलत आहेत हे सर्व त्यांची अहंकारी वृत्ती बोलत आहे. त्यांनी अहंकारी वृत्ती वापरू नये, ते एका समाजासाठी लढत आहेत. त्यांना आरक्षण नको आहे. त्यांना मुद्दे बनून न्यूज मिडीयामध्ये राहायचं आहे, म्हणून ते हे सर्व करीत आहे आणि मराठा समाजाला सरकारने ईडब्ल्यूएसमध्ये १० टक्के आरक्षण दिलं आहे. आरक्षण फार मोठे आहे आणि एका बाजूला ओबीसी समाजामध्ये ३५३ जाती आहेत, त्यांना १९ टक्के आरक्षण आहे.

♦️जर मराठा समाज यामध्ये समाविष्ट झाला तर ३५४ जाती होतील आणि आरक्षण १९ टक्केच राहील परंतु, मराठा समाजाला एकट्या ईडब्ल्यूएस मध्ये १० टक्के आरक्षण सरकारने दिलय आणि ही फार मोठी बाब आहे. आता मनोज जरांगे पाटील हे फक्त मीडियामध्ये राहण्यासाठी आणि आपली महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य आणि उपोषण करत आहेत. आता त्यामागे त्यांची कोणती महत्त्वाकांक्षा आहे. हे समाजाने ठरवावं,असा खोचक टोला परिणय फुके यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे. गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागेबद्दल परिणय फुके यांनी ठामपणे सांगितले की, तुम्ही लिहून ठेवा या चारही जागा भाजपा जिंकणार. गोंदिया जिल्हा विधानसभेमध्ये तिरोडा-गोरेगाव विधानसभेची जागा ही भाजपाकडे आहे. तर अर्जुनी मोरगाव विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे अजित पवार गटाकडे आहे. गोंदिया विधानसभेची जागा अपक्ष आमदार यांच्याकडे आणि देवरी-आमगाव विधानसभेची जागा काँग्रेसकडे आहे. गोंदियात एकमेव जागा भाजपकडे असून सुद्धा परिणय फुके यांनी चारही विधानसभेवर दावा केल्याने पुन्हा एकदा महायुतीत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
