फुलचंद भगत
वाशिम:-नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेने डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढलेला दिसत असून या वातावरणात भाकरी खाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे भाकरी आता महाग झाली आहे. बाजरी आणि ज्वारीचे दर चांगलेच वधारले, तर गव्हाचे दरही चांगलेच वधारले आहेत. बाजरीच्या दरात किलो मागे चार रुपयांनी वाढ झाली आहे. गावरान बाजरीला मागणी असल्याचे वाशिम जिल्ह्यातील किराणा भुसार व्यापारी यांनी सांगितले. गुजरात येथून बाजरीची आवक वाढली आहे. गव्हापेक्षा बाजरीला मागणी आहे. म्हणूनच पूर्वी गव्हापेक्षा खूप स्वस्त मिळणारी बाजरी गव्हासारखीच भाव खात आहे.सध्या बाजरीचे भाव ४० रुपये पार आहेत.

मंगरुळपीर तालुक्यात गव्हाचा हंगाम संपतोय म्हणून वाढले दर, पण बाजरीलाच मागणी

दोन महिन्यांत गव्हाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. शरबती गहू ४४ रुपये किलो या दराने सध्या विक्री होत आहे.गव्हाचा हंगाम संपत असल्याने पंधराच दिवसांत दर वाढले. तर बाजरीदेखील जवळपास याच दरात मिळत आहे. बहुतांश घरांमध्ये हिवाळ्यात बदल म्हणून ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीला विशेष प्राधान्य दिले जाते. परंतु, आता ज्वारी आणि बाजरीची भाकरही महाग झाली आहे.मधुमेह रुग्णांसाठी ज्वारी, बाजरी उत्तम असते. हिवाळ्यात बाजरीचे सेवन शरीरातील अंतर्गत उष्णता टिकवून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. सतत सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असलेल्यांनी आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा. ज्वारी आणि बाजरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी व रक्तातील साखर कमी करण्यासाठी रामबाण समजली जाते. पोटाच्या विकारासाठी व विविध आजारांतील रुग्णांसाठी बाजरी शक्तिवर्धक आहे. याशिवाय वजन कमी करण्यासाठीदेखील बाजरी उपयुक्त असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.गेल्या महिन्यापर्यंत दर्जानुसार ३० ते ३५ रुपये किलोपर्यंत विकल्या जाणाऱ्या बाजरीचे दर दर्जानुसार ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढलेली मागणी आणि कमी असलेला साठा लक्षात घेता ज्वारीचे दरही चांगलेच वधारले आहेत. मात्र, आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने बाजरी खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

थंडीमुळे वाढली मागणी

हिवाळा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून उष्णतावर्धक खाद्यपदार्थांना मागणी वाढू लागली आहे. थंडीमुळे गेल्या काही दिवसांपासून बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी उष्ण असल्याने ती थंडीत आवर्जून खाल्ली जाते. जेवणात एकवेळ बाजरीच्या भाकरीचा समावेश होऊ लागला आहे. तूप व गुळासोबत बाजरीची भाकरी खाल्ल्याने थंडी दूर पळते, असे समजले जाते. याशिवाय भरीतसोबत भाकरीला मागणी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *