फुलचंद भगत
वाशिम:- कधीकाळी पहाटेच्यावेळी धान्य दळताना जात्याचा परपरण्याचा आवाज अन महिलांच्या मंजूळ आवाजातील ओव्या आज ऐकू येईनाशा झाल्या आहेत. बदलत्या काळानुसार आधुनिकीकरण वाढल्यामुळे ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या जुन्या पद्धती, जुनी साधने काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. त्यात एक म्हणजे जातं,पाटा, वरवंटा यासह अनेक आठवणीतील गोष्टींचा समावेश आहे.
पूर्वीच्या काळी धान्य दळताना महिलांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ओव्यांमधून नात्यातील घेतलेल्या नामोल्लेखामुळे नात्यातील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी व ओलावा ओसंडून वाहत होता. ओव्यातून देव देवताबद्दलची अपार श्रद्धा व्यक्त होत असायची. मात्र विज्ञानाने जशी प्रगती केली. तसं तसं ग्रामीण संस्कृतीचा आविभाज्य घटक बनलेल्या अनेक वस्तु लुप्त होत गेल्या. आता गावोगावी पिठ गिरण्या झाल्याने महिलांना जात्यावरील ओव्याही हरवल्या.आरामाचे दिवस अनुभवता येत आहेत. मात्र ग्रामीण संस्कृतीचा बहुमोल खजिना मात्र कालबाह्य होत आहे, एवढे मात्र निश्चित.

महत्वाच्या वेळीच आता जात्याचा उपयोग
आताही अडगळीत पडलेल्या जात्याला बाहेर काढण्याचा मोह महिलांना होतोय तो फक्त हळदीच्या घाण्यापुरताच. वधू- वरांच्या लगीन घरी हळद दळण्यासाठी जात्याची खास पूजा करण्यात येते. पाच सवाष्णी मिळून ‘सईबाई ग सईबाई’ अशा ओव्या आता पुन्हा अधून-मधून कानावर येऊ लागल्या आहेत.
ओव्यांमधून व्यक्त होत होता नात्यातील ओलावा
धान्य दळताना महिलांच्या मुखातून निघणाऱ्या ओव्यांमधून सासरच्या, माहेरच्या नात्यागोत्यातील व्यक्तींचा नामोल्लेख होत असे. त्यामुळे त्यातून आपसुकच जिव्हाळा, प्रेम, आपुलकी हे भाव व्यक्त होत असत. यामुळे नात्यागोत्यातील व्यक्तीबद्दलची आपुलकी कायम टिकून होती. पण काळाच्या ओघात जात्याबरोबर नात्यातील ओलावाही गायब झाला आहे. सोबतच या जात्याचा फिरता प्रवासही नामशेष झाला आहे.