- पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारीला आळा बसणार, नागरिकांत समाधान.

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची कारवाई मानली जात असून, शहरातील सिटी पॅलेस परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मालेगाव पोलिसांनी गांधीनगर येथील रहिवासी रितेश गजानन इंगळे या तरुणाला संशयाच्या आधारे थांबवले. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे लोखंडी पात्याची एक तलवार आढळून आली. अवैध आणि धोकादायक शस्त्र बाळगल्याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रवी सैबेवार, हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, शिवाजी काळे, पोलीस नाईक जितू पाटील, अमोल पवार आणि सैनिक गणेश तागड व महादेव मुठाळ यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसणार असून, नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी फुलचंद भगत,
एनटीव्ही न्यूज मराठी, मंगरुळपीर/वाशिम.