सालाबाद प्रमाणे हजरत दादा हयात कलंदर यांचा 795 उर्स यावर्षी मोठा उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवशी नेहमीच्या परंपरेप्रमाणे दादा हयात कलंदर यांच्या दर्गा वरून फकीर व बाबा लोकांची मिरवणूक नगराला परिक्रमा करत संत बिरबलनाथ महाराजांच्या मंदिरावर ढोल ताशाच्या गजरात पोहोचली. याप्रसंगी मंदिराच्या प्रवेशद्वारावर संस्थानाचे अध्यक्ष श्री रामकुमार रघुवंशी व उत्तमराव पाटील यांनी त्यांचे पुष्पहार घालून सहर्ष स्वागत केले. त्यानंतर या मिरवणुकीतील सर्व संत फकीर यांना मंदिरात आसनस्थ करून सर्वांचे यथोचित स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वांना अल्पोपहार आणि चहा पाण्याची व्यवस्था संस्थांतर्फे करण्यात आली .कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर ढोल ताशाच्या गजरात मंदिरातून मिरवणूक दिवाण साहेब दरगाहाकडे प्रस्थानीत झाली.

शेकडो वर्षापासूनची ही परंपरा या शहरात अजूनही जोपासल्या जात असून अनेक विघ्न संतोषी लोकांच्या मनसुब्यांना नाकारणारी व सामाजिक सौहार्द जोपासणारी, तसेच हिंदू मुस्लिम बंधुता वाढवणारी ही परंपरा अजूनही चालू आहे. आजच्या तनातनीच्या काळात ही बाब म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला अत्यंत पोषक असून शुल्लक कारणावरून वाद निर्माण करणाऱ्यांना ते एक प्रकारचे उत्तर आहे.खरे तर अशा प्रकारचे उत्सव हेच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक परत असून या परंपरांना जोपासण्याची आवश्यकता असून ही पद्धत हे फकीर लोक व श्रीनाथ संस्थांनाचे लोक मिळून आजही करतात .गेल्या अनेक वर्षापासून या कार्यक्रमात अजूनही खंड पडला नाही हे विशेष.
तशी या शहरात हिंदू मुस्लिम सौहार्दता जोपासणारी अनेक मंडळी होऊन गेली असून ,अनेकांनी आपले जीवन हे कसे परस्परावलंबी आहे हे आपल्या जगण्याच्या पद्धतीतून या शहराला दाखवून दिले आहे ,परंतु दुर्दैवाने आजच्या पिढीला या सर्व गोष्टीचा विसर पडला आहे .
खरे तर या शहरात असा बंधुभाव जोपासणारी अनेक माणसे होऊन गेली व आजही गेल्या पिढीतील कित्येक लोक अजूनही आपला बंधुभाव जोपासत आहेत. त्यात,गतकाळात होऊन गेलेल्या व्यक्तीमध्ये डॉक्टर संजीव वाडेकर व अहमदखा बीए, मिर्झा गामा बेग व व डॉक्टर राठी , उमर मिस्तरी व सुधाकरराव परळीकर , श्री श्याम शर्मा व बुद्धा शेठ ,श्री रहीम गुल पठाण श्री सुखदेव इंगळे ,श्री.सोमानी व श्री कांबळे साहेब, श्री.लक्ष्मीकांत महाकाल व सईद खान साहेब अशा अनेक लोकांनी आपले जीवन या सामाजिक ऐक्याकरता उदाहरण म्हणून प्रसिद्ध केले .तर आज मीतिला श्री.दत्ता चेके व श्री मुजफ्फर, श्री.इस्तियाक हुसेन व श्री.सुभाषराव ठाकरे , श्री शफायतुल्ला व श्री सुभाष हतोलकर, श्री.शमशुद्दीन जहागीरदार व श्री.रामकुमार रघुवंशी , हे लोक ही परंपरा अजूनही चालू होत असून खरे तर शांतता समितीच्या सदस्यासाठी हेच लोक पात्र आहेत. असेच लोक सामाजिक सौहार्दता व सलोखा तसेच बंधूभावाचे उदाहरण असून अशा लोकांचा आदर्श समाजाने जर घेतला तर उरूस असो किंवा यात्रा कोणत्याही प्रसंगात कोणताही अडथळा येऊ शकत नाही, दुर्दैवाने आज ही परंपरा व तशा व्यक्तीची समाजात उणीव आहे, आणि तीच उणीव भरून काढण्यासाठी ही फकीर लोकांची नाथ महाराजांच्या मंदिरात असलेली भेट बरेच काही सांगून जाते .
याप्रसंगी मला एका उर्दू साहित्यिकाच्या चार लाईन आठवतात, त्या या ठिकाणी खूपच प्रासंगिक ठरतील असे मला वाटते त्या म्हणजे,

ना इधर उधर की बात कर,
बता ये काफीला लुटा क्यो,
मुझे रहजनोसे गिला नही,
बस तेरी रहबरी का सवाल है !
यात रहजनोसे म्हणजे रस्त्यात लुटणाऱ्या लोकांचा समावेश आहे तर रहेबर म्हणजे रस्ता दाखविणाऱ्या मार्गदर्शकाचा उल्लेख आहे. यात म्हणावयाचे असे आहे की मला रस्त्यात लुटणाऱ्या वाट मारू लोकांशी काही संबंध नाही मात्र तू हा रस्ता का दाखवला याचे मला दुःख आहे .
आणि नेमके हेच शल्य आज सामाजिक वातावरणात वावरताना दिसून येते .
——– प्रा अरुणकुमार इंगळे
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206