वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या जनावरांच्या मालकांना महानगरपालिकेचा दणका

अहिल्यानगर – बंगाल चौकी परिसरात बस स्टॉपच्या शेडमध्ये, रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी सातत्याने जनावरे बांधणाऱ्या, महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता वारंवार रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या जनावराच्या मालकावर महानगरपालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे. बंटी श्रीनिवास वायकर (राहणार – बंगाल चौक) असे त्याचे नाव आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणे जनावरे बांधणाऱ्या जनावराच्या मालकावर यापुढे अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

बंगाल चौकी परिसरात बस स्टॉप वर व रस्त्यावर सातत्याने जनावरे बांधली जातात. या ठिकाणी जनावरांना नुकसान पोहोचवणाऱ्या घटनाही वारंवार घडलेले आहेत. महानगरपालिकेने सदर जनावराच्या मालकावर यापूर्वीही कारवाई केलेली आहे. मात्र महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता वारंवार रस्त्यावर जनावरे बांधली जात असल्याने अखेर महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलत सदर जनावराच्या मालकावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जनावराच्या मालकांनी आपली जनावरे आपल्या स्वतःच्या जागेत सुरक्षित ठिकाणी बांधावीत. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, इतर नागरिकांना त्रास होईल, उपद्रव निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर जनावर बांधू नयेत. अन्यथा महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास जनावराच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *