जिल्हा महासंघाच्या वतीने सटाणकर यांचा सत्कार ; अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना बारा बलुतेदार, आलुतेदार, एसबीसी, मायक्रो ओबीसी सामाजिक दृष्ट्या खूपच मागे आहे. या समाजातील सक्षम असणारे बहुसंख्य आजही उपेक्षित आहेत. त्यामुळे या समाजाचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक धोरण नव्याने ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून राज्याच्या राजकारणात कल्याणराव दळे हे नवे नेतृत्व प्रकट होत असून ते नेतृत्व सक्षम करण्यासाठी आणि अन्यायग्रस्त जातींना न्याय प्राप्त होण्यासाठी राज्यातील बारा बलुतेदारांची चळवळ पुढे नेण्याची गरज आहे.असे प्रतिपादन बारा बलुतेदार महासंघाच्या नगर जिल्हा शाखेचे जनसंपर्क प्रमुख राजेश सटाणकर यांनी केले आहे.
स्वातंत्र्यानंतर अक्षम्य,दुर्लक्ष आणि नाकर्तेपणामुळे बारा बलुतेदारांच्या मोठा वर्ग उपेक्षित आहे. या उपेक्षितांचे पहिले अधिवेशन येत्या २ डिसेंबरला मुंबईत होत असून समाजाने गांभीर्य लक्षात घेऊन अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. सत्कार आणि अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी महासंघाच्या सभेचे नगरला आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.सटाणकर यांचा शरीफजी राजे भोसले स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल हृद्य सत्कार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली मामा गायकवाड होते.तर संत नामदेव देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे नगर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, महासंघ युवा शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पवार, शहर संपर्क प्रमुख संजय उदमले, काशीकापडी समाजाचे नेते व जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सुनील भिंगारे, भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पर्यटन विकासातून जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार मिळेल.असेच लिखाण सटाणकर यांनी केले त्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला असे अध्यक्षीय भाषणातून माऊली मामा गायकवाड यांनी सांगितले. बारा बलुतेदार महासंघाचे राज्य अधिवेशन येत्या २ डिसेंबर २०२१ रोजी रंगशारदा सभागृह मुंबई येथे दुपारी १२ वाजता आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती असावी असा आणि बाराबलुतेदारांची चळवळ पुढे नेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा सत्कार आहे असेही ते म्हणाले. श्रीकांत मांढरे म्हणाले सटाणकर चळवळीत सक्रिय आहेच.त्यांनी लेखनातून केलेल्या सेवेबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला याचा बाराबलुतेदार समाजाला अभिमान आहे.
जनमोर्चाचे बाळासाहेब भुजबळ यांनी ‘ही चळवळ गतिमान करण्यासाठी जे तन-मन-धनाने कार्यरत आहेत त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे तरच ही चळवळ यशस्वी होईल आणि समाजाला न्याय मिळेल’ असे सांगितले. नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष इंजिनीयर बाळासाहेब भुजबळ यांनी सटाणकर यांचे अभिनंदन केले.या प्रसंगी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे महिला विभागाच्या प्रमुख रजनी आमोदकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप घुले, शहराध्यक्ष शामराव औटी , महिला जिल्हाप्रमुख अनुरिता झगडे, शहर कार्याध्यक्ष महेश कांबळे, उपप्रमुख सौ छाया नवले, युवा शाखेचे आदिनाथ गायकवाड, मल्हारी गीते, जिल्हा सचिव सुभाष बागुल, मार्गदर्शक सल्लागार बाबुराव दळवी आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत श्री इवळे यांनी तर प्रास्ताविक श्री पवार यांनी केले शेवटी श्री उदमले यांनी आभार मानले.