♦️२९ वर्षांनंतर शाळा भरली अन् आठवणींची घंटा वाजली
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल या शाळेतील सन १९९१ ते १९९६ या वर्षात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत ‘अ’ तुकडीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व सेवानिवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा रविवारी (दि. १३) संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने तब्बल २९ वर्षांनंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सॲप ग्रुपवर ‘गेट-टु गेदरची’ संकल्पना मांडली. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘गेट-टु गेदरची’ संकल्पना प्रत्यक्षात खरी करुन दाखविली. प्रारंभी सर्व शिक्षकांचे पायघड्या अंथरून फुलांच्या वर्षावात व तुतारीच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिक्षकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवगर्जना करण्यात आली. फुलांचे हार, रंगी बेरंगी रांगोळी काढलेल्या तत्कालीन इयत्ता १० वी ‘अ’ च्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत केले. ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय या प्रार्थनेने वर्ग पुन्हा गजबजला. राष्ट्रगीत सुरु असताना जुन्या आठवणींनी अनेकांना गहिवरून आले. दरम्यानच्या काळात निवर्तलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विद्यार्थी संजय धोत्रे यांनी मैत्रीचे नाते स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे सांगून प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

त्यानंतर विद्यालयाचे माजी प्राचार्य विश्वनाथ जाधव, माजी उपप्राचार्य भास्कर गोरे, तात्यासाहेब दरेकर,संभाजी काळे, लीला तोडमल, प्रमिला लगड, पद्मा पटारे, आशा गाडे या शिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते विद्यार्थी दशेत असताना योग्य मार्ग दाखविणाऱ्या गुरुजनांचे गुरुपूजन करून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोपटे देऊन यथायोग्य सन्मान करण्यात आला. अविनाश कराळे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. शाळा आणि शिक्षकांबद्दल आजही तुमच्या मनात असलेला आदर आणि ऋणानुबंधाची भावना बघून समाधान वाटते. भविष्यात अशा प्रकारचे गेट-टुगेदरचे कार्यक्रम घेऊन शिक्षक आणि शाळा यांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते घट्ट होण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा पुन्हा करावे, असे भावनिक आवाहन शाळेचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी यावेळी केले. सन १९९१ ते १९९६ या बॅचमधील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यानुसार शाळेचे व शहराचे नाव विविध क्षेत्रात नावारूपाला आणले असून त्या सर्वांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे गौरवोद्‌गार विश्वनाथ जाधव, भास्करराव गोरे, संभाजी काळे, तात्यासाहेब दरेकर, राजेंद्र लांडे, मनोहर शिंदे, हुसेन शेख, लता दिवटे, पद्मा पटारे, सुमती काळे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. अविनाश कराळे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे नाव, गावं, स्वभाव व गुणांचा उल्लेख करून सादर केलेल्या कवितेने उपस्थितांची वाहवा मिळवली. क्रांती दहातोंडे, दिपाली डाळवाले, सुवर्णा गोरे, पुष्पा हापसे, अर्चना म्हस्के, योगिता म्हस्के, सुरेखा पुंड, जयश्री टेकाडे, संजय बाबर, उमेश चापे, शिवजीत डोके, राम नळकांडे, संदीप नन्नवरे, सय्यद युसुफ, गणेश उकिर्डे, मंगेश उल्हारे, राहुल गाडे, सुदर्शन हेंद्रे, अभिजीत जगताप, प्रशांत जगताप, दिपक कहांडळ, विनायक कांबळे, सचिन मेहता, फिरोज शेख, यशवंत आमले, अनिता भगत, प्रमिला भोसले, वृषाली जाधव, मनीषा म्हस्के या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपापला परिचय करून देताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेचे आपण माजी विद्यार्थी आहोत. शाळेमुळे आपण घडलो. शाळेने आपल्यावर संस्कार केले. शिक्षकांनी आपल्याला घडविले हे सांगताना अनेकांनी आपल्या अश्रूंना नकळतपणे वाट मोकळी करून दिली. आजही समाजात शाळा आणि शिक्षकांविषयी आदर, मान-सन्मान असल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून व्यक्त झाला. विनया वाघ व प्रवीण विधाते यांनी सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमात रंगत भरली होती. सर्व शिक्षकांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या जुन्या इमारतीची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाला अहिल्यानगर, हैद्राबाद, मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव येथून विद्यार्थी आले होते. यावेळी शाळेप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी व शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेला १० सिलिंग फॅन देत असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश कराळे, सचिन ठोसर,आनंद सिसोदिया, मुकेश नळे, बिपीन काटे, मृणाल ठुबे, विनया वाघ आदींसह माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अविनाश कराळे व मृणाल ठुबे यांनी केले. आभार सचिन ठोसर यांनी मानले.