वाशिम :
वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कंबर कसली आहे. समाजविघातक कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत. याच धर्तीवर, वाशिम पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, व्हिडिओ पायरेट्स, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा १९९६, २००९ व २०१५) म्हणजेच ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे.
अब्दुल साजीद उर्फ शाहरुख अब्दुल माजीद (रा. पंचशील नगर, वाशिम) याच्यावर वाशिम जिल्ह्यात प्राणघातक हल्ले, गंभीर दुखापती, चोरी आणि जबरीचोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला खंडणीच्या अर्जांमुळेही ओळखले जाते. यापूर्वी २०२० मध्ये त्याच्यावर ‘मकोका’ (संघटित गुन्हेगारी) कायद्यान्वये कारवाई झाली होती आणि तो जवळपास पाच वर्षे न्यायालयीन बंदी म्हणून कारागृहात होता. कारागृहातून सुटल्यानंतरही त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवल्याने, त्याच्याविरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल झाला होता.
सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, १४ जुलै २०२५ रोजी अब्दुल साजीद उर्फ शाहरुख अब्दुल माजीद याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. त्याला तातडीने वाशिम जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले आहे. तसेच, १० जुलै २०२५ रोजी संतोष ठोके याच्यावरही ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई करून त्याला वाशिम जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे.
या दोन्ही आरोपींना वाशिम जिल्हा कारागृहात ठेवल्यास ते इतर गुन्हेगारांशी संपर्क साधून गुन्हेगारी कृत्य करू शकतात, या शक्यतेमुळे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वाशिम जिल्हा कारागृहातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, लवकरच संतोष ठोके याला पुणे येथील कारागृहात आणि अब्दुल साजीद उर्फ शाहरुख अब्दुल माजीद याला नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी जिल्हयातील रेकॉर्डवरील, गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगार आणि आर्म अॅक्टमधील गुन्हेगार यांची कसून तपासणी करून त्यांच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ किंवा ‘तडीपार’ अशा प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाया करून कठोर प्रतिबंध ठेवले जात असल्याचे सांगितले. भविष्यातही अशाच प्रकारच्या दर्जेदार प्रतिबंधात्मक कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, आणि सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर (वाशिम शहर), सपोनि जगदीश बांगर, पोउपनि निलेश जाधव आणि अंमलदार विजय नागरे, विनोद सुर्वे, संतोष वाघ, गोपाल चौधरी, कैलास कोकाटे, शैलेशसिंह ठाकूर, राजेश राठोड, उमेश देशमुख, संतोष कोरडे, श्रेयश नेतनस्कर, महादेव भीमटे यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रतिनिधी फूलचंद भगत
एनटीव्ही न्यूज मराठी, वाशिम.