‘लायनमॅन’ गायब, बत्ती गुल! आष्टी परिसरात वीज समस्येने नागरिक हैराण..!
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी भागात गेल्या अनेक वर्षांपासून विजेची समस्या कायम आहे. या भागातील मार्कंडा कंन्सोबा परिसरात दररोज विजेचा लपंडाव सुरू असूनही विद्युत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, या भागाचा विकास खुंटला असून, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांचाही अभाव जाणवत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
आष्टी परिसरातील गावात किरकोळ कारणांमुळेही अनेकदा वीजपुरवठा दिवस-रात्र खंडित राहतो. वीज कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेरगावाहून ये-जा करत असल्यामुळे एकदा खंडित झालेला वीजपुरवठा दोन ते तीन दिवस, तर कधी-कधी चार ते आठ दिवसांपर्यंत सुरळीत होत नाही. यामुळे नागरिकांना विजेसंबंधित कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मागील आठ ते पंधरा दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ज्या गावात स्थायी लाईनमन नियुक्त केले आहेत, त्यांना त्याच गावाचे काम सांभाळण्याचे आदेश द्यावे, तसेच रिक्त जागांवर नवीन लाईनमनची नियुक्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आष्टी येथील कनिष्ठ अभियंता ६० किलोमीटर दूर राहतात. त्यांना फोन केला असता ते व्यस्त असल्याचे सांगतात किंवा व्यस्त असल्याचा बहाणा करतात, असेही नागरिकांनी सांगितले. मार्कंडा (कंन्सोबा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे तिथे २४ तास वीजपुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे, पण तसे होत नाही. त्यामुळे मार्कंडा (कं) येथे कायमस्वरूपी लाईनमन (पुरुष) नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. एकाच लाईनमनवर अनेक गावांचा ताण न देता, ज्यांची ज्या ठिकाणी नियुक्ती झाली आहे, त्यांनाच ती जबाबदारी द्यावी आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येवर लक्ष घालून ती सोडवावी, अशी मागणी मार्कंडा कंन्सोबा येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
(प्रतिनिधी भास्कर फरकडे, एनटीव्ही न्यूज मराठी, गडचिरोली)