धर्मराव कृषि विद्यालय, अहेरीच्या १९८५ च्या तुकडीचा हृदयस्पर्शी स्नेह मिलन सोहळा
चंद्रपूरच्या माता महाकाली देवीच्या पावन भूमीत सदर सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न
चंद्रपूरमध्ये १९८५ च्या बॅचचे पुनर्मिलन; अनेकांच्या डोळ्यात अश्रू, जुन्या आठवणींना मिळाला उजाळा..!
दिनांक १४ डिसेंबर रोजी हॉटेल ब्रिजवे, चंद्रपूर येथे धर्मराव कृषि विद्यालय, अहेरी – शालांत १९८५च्या बॅचचा भव्य व हृदयस्पर्शी गेट टुगेदर कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला. चंद्रपूरच्या माता महाकाली देवीच्या पावन भूमीत हा सोहळा पार पडणे, ही सर्वच माजी विद्यार्थ्यांसाठी विशेष अभिमानाची बाब ठरली.
या गेट टुगेदरचे आयोजन चंद्रपूरच्या सर्व वर्गमित्र-वर्गमैत्रिणींनी अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळले, त्यात आदरणीय डॉ. उत्तरवार भाऊजी यांचे विशेष मार्गदर्शन व नेतृत्व लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सर्व वर्गमित्र-वर्गमैत्रिणी व त्यांच्या परिवारांचे भव्य व हृदयस्पर्शी स्वागत, आदरणीय डॉ. उत्तरवार भाऊजी यांच्या स्वागत गीताने करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
त्यानंतर दिवंगत वर्गमित्र व दिवंगत गुरुजनांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा क्षण सर्वांच्या मनाला चटका लावणारा होता. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन वर्गमित्र श्री. लक्ष्मण दुर्गे यांनी केले, तर प्रास्ताविक वर्गमैत्रीण सौ. जयश्री पाचखेडे यांनी सुंदर शब्दांत मांडले. त्यानंतर सर्व वर्गमित्र-वर्गमैत्रिणींचा परिचय सत्र पार पडला.
त्यानंतर पुढे वर्गमित्र श्री. नामदेव कुसराम (कोषागार अधिकारी, अहेरी) यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गोपाल आत्राम, गिरीष मुंजमकर, परभणीवरून आलेले वर्गमित्र श्री. मिलिंद सराफ, जयंत सोनुले, श्रीमती बेबीताई आकोजवार तसेच इतर वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणींनी आपले भावनिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात लक्ष्मण दुर्गे, जाफर अली सय्यद, आदरणीय डॉ. उत्तरवार भाऊजी, सौ. जयश्री पाचखेडे व सौ. उमाताई उत्तरवार यांनी सादर केलेली सुंदर गीते कार्यक्रमाची रंगत वाढवून गेली. यानंतर सर्वांनी मिळून केलेले सामूहिक नृत्य हा आनंदाचा परमोच्च क्षण ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी वर्गमित्र श्री. चंदू कोमरेवार यांनी सर्वांचे हृदयस्पर्शी शब्दांत आभार मानले.
हा गेट-टुगेदर म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हता, तर ४० वर्षांच्या मैत्रीला पुन्हा उजाळा देणारा, आयुष्यभर लक्षात राहील असा सुवर्णक्षण होता.
शंकर मुत्येलवार, एनटीव्ही न्यूज मराठी, अहेरी, गडचिरोली.
