अकोला विमानतळाच्या नामांतरासाठी खासदार अनुप धोत्रे आक्रमक; केंद्रीय मंत्र्यांकडे केली मागणी.
शेगावच्या गजानन भक्तांसाठी अकोल्यातून विमानसेवा ठरणार अत्यंत सोयीची.
१८ मीटर रुंदीच्या धावपट्टीचे काम लवकरच होणार सुरू; भूसंपादनाची प्रक्रिया वेगवान.
पायलट प्रशिक्षण केंद्र आणि छोट्या विमानसेवेबाबतही सकारात्मक चर्चा सुरू.
विदर्भाची पंढरी संत नगरी अकोल्यापासून ४५ किलोमीटर दूर असून पश्चिम विदर्भाची ओळख संत गजानन महाराज यांच्यापासून आहे. अकोल्यातून विमान सेवा सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार असून, अकोला विमानतळाला ‘संत गजानन महाराज विमानतळ’ हे नाव देण्यात यावं अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना केली आहे.
संत गजानन महाराज नगरी शेगाव येथे मुंबई आणि देशभरातून मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात. अकोलेकरांच्या असंख्य नागरिकांची मागणी आहे की, या विमानतळाला महाराजांचे नाव देण्यात यावे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा मागणी करण्यात आली असून, राज्य शासनाने ठराव मंजूर केल्यास त्वरित कारवाई केली जाईल असे अभिवचन मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.
राज्य शासनाने विमानतळ विस्तारासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू केले असून जिल्हाधिकारी वर्षाताई मीना यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. लवकरच १८ मीटर रुंदीच्या धावपट्टीचे काम सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करत राज्य आणि केंद्र सरकार यासाठी कटिबद्ध असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. तसेच, विशेष पायलट प्रशिक्षण केंद्र आणि छोटी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रतिनिधी: एनटीव्ही न्यूज मराठी, अकोला
