शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरील बैठकीत संघटना बळकटीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उपनेते तथा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अमरावती, बुलढाणा आणि राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आमदार नितीन देशमुख यांची अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तीन लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांमध्ये संघटना अधिक सक्रिय करणे आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामाला वेग देण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना “संघटना मजबूत करा, येणारा काळ आपलाच आहे” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच राज्यातील पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *