करंजखेड येथील सुराशेवाडी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डेंग्यूच्या आजाराने अवघ्या १२ वर्षीय सोहम सुभाष ससे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सुराशेवाडी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोहमसह त्याचे वडील सुभाष ससे आणि त्यांच्या मुलीलाही डेंग्यूची लागण झाली होती. वडील आणि मुलगी उपचारानंतर सावरले; मात्र सोहमला वाचवता आले नाही. या घटनेनंतर कुटुंबीयांनी करंजखेड आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत.

करंजखेड येथील सुराशेवाडी परिसरातील ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. अवघ्या १२ वर्षांच्या सोहम सुभाष ससे याला डेंग्यूची लागण झाली आणि उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोहमच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोहमचे वडील सुभाष ससे आणि त्यांच्या मुलीलाही डेंग्यूची लागण झाली होती. एकाच कुटुंबातील तिघेजण आजाराशी झुंज देत होते. उपचारानंतर सुभाष ससे आणि त्यांची मुलगी सावरले; मात्र सोहम या आजारातून बाहेर पडू शकला नाही.

सहा दिवसांपूर्वी सोहमची प्राणज्योत मालवली. मात्र त्याचे वडील आणि बहीण MGM रुग्णालयात उपचार घेत असल्याने सोहमचा मृतदेह सहा दिवस शीतगृहात ठेवण्यात आला. वडिलांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर काल सोहमवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी करंजखेड आरोग्य विभागावर गंभीर आरोप केले आहेत. साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, करंजखेडचे उपसरपंच हर्षवर्धन निकम यांनीही आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वैद्यकीय अधिकारी श्रीमती शोगन यांच्याबाबतही उपसरपंचांनी गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी पदभार सोडलेला नसल्याचे, तसेच त्या केवळ एक दिवस काम करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. नागरिकांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र या सर्व आरोपांबाबत संबंधित आरोग्य विभाग आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.

सोहमच्या मृत्यूने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता तरी सुराशेवाडी आणि करंजखेड परिसरात डेंग्यूसह साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग ठोस उपाययोजना करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिनिधी : रविंद्र खरात | एनटीव्ही न्यूज मराठी | करंजखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *