रानभाज्या ही कोकणच्या मातीची व निसर्गाची खरी ओळख आहे. हा पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ अंतर्गत भव्य रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ला येथे करण्यात आले.
‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब आणि हिरकणी महिला शहर स्तर संघाच्या संयुक्त विद्यमाने, तसेच विशाल परब पुरस्कृत या स्पर्धेचे उद्घाटन वेदिका विशाल परब यांच्या हस्ते पार पडले. बदलत्या जीवनशैलीत रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीला पटवून देणे व महिलांच्या कलागुणांना वाव देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा नेते राजू राऊळ आणि बाळू देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पर्धेत महिलांनी टायकाळा, लाजरी व कर्टुल यांसारख्या रानभाज्यांपासून लाडू, मोदक, सरबत, चटणी, सूप आणि अप्पे यांसारखे नाविन्यपूर्ण पदार्थ बनवून उपस्थितांची मन जिंकली. रश्मी कुडाळकर, डॉ. भरत आवळे आणि डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
स्पर्धेत जाई सुनील नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर सुश्मिता गावकर यांनी द्वितीय आणि सुजाता साटम यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अनुष्का राणे, जानव्ही सावंत व मंगेश माणगावकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. या सोहळ्याला इनर्व्हील क्लबच्या अध्यक्ष ज्योती देसाई, हिरकणी संघाच्या अध्यक्ष आकांक्षा परब आणि ‘माझा वेंगुर्ला’चे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.
शुभम गवस, एनटीव्ही न्यूज मराठी, वेंगुर्ला.
