‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकारातून कळमेश्वरमध्ये भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेत युवक, युवती, शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

‘जय हिंद! जय भारत!’ आणि ‘भारत माता की जय!’च्या घोषणांनी कळमेश्वरचा परिसर दुमदुमून गेला. तिरंगा हा स्वातंत्र्य, त्याग, एकता आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत भारताला २०४७ पर्यंत विकसित आणि जगात अग्रस्थानी नेण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन डॉ. आशिषराव देशमुख यांनी केले.

सावनेर-कळमेश्वर परिसरात झेन झी पिढीसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. कळमेश्वर तालुक्यातील लिंगा परिसरातील प्रस्तावित कोलगॅसिफिकेशन प्रकल्प, सावनेर तालुक्यातील सुमारे ६,४०० एकर क्षेत्रातील एमआयडीसी आणि खत प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एमआयडीसीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली. “शेतकरी हा माझा दैवत आहे,” असे सांगत सावनेर-कळमेश्वर परिसरातील नऊ गावांतील शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा योग्य आणि समाधानकारक मोबदला मिळवून देण्यासाठी शासनाकडे ठाम पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. योग्य मोबदला न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, प्रिया मानकर, मीना तायवाडे, नितीन गेडाम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी, सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या आयोजनातून झालेल्या या रॅलीतून ‘राष्ट्र प्रथम आणि विकासासाठी एकजूट’चा संदेश देण्यात आला.

प्रतिनिधी मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *